कल्याण येथे गाडी घसरल्याच्या गुरुवारच्या घटनेतून प्रवासी सावरत नाही, तोच शुक्रवारी दुपारी भिवपुरी रोड आणि कर्जत यादरम्यान ओव्हरहेड वायरला धरून ठेवणारी कॅटेनरी वायर तुटल्याने आणि एका लोकलचा पेंटोग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले.
या घटनेमुळे कर्जत आणि खोपोली येथे जाणाऱ्या गाडय़ा बदलापूर आणि वांगणी येथे रद्द करून पुन्हा मुंबईकडे वळवल्या जात होत्या. परिणामी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान तीन लांब पल्ल्यांच्या गाडय़ा खोळंबून राहिल्या आणि चार उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या. शुक्रवारी दुपारी कर्जतला जाणारी गाडी भिवपुरी रोड स्थानकापुढे गेली.
त्यानंतर त्या गाडीमागून एक लांब पल्ल्याची गाडी जात असताना या गाडीच्या इंजिन चालकाला ओव्हरहेड वायरला धरून ठेवणारी कॅटेनरी वायर तुटल्याचे आढळले. या इंजिन चालकाने या गोष्टीची माहिती तातडीने नियंत्रण कक्षाला दिली.