प्रवासी सुरक्षेकडे सध्या काटेकोरपणे लक्ष देणाऱ्या मध्य रेल्वेवर सोमवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी वेळापत्रक कोलमडले. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणाऱ्या गाडीचा पेण्टोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने ही गाडी बंद पडली. या गाडीमागे असलेली गाडीही जागीच खोळंबली. हा बिघाड दुरुस्त होण्यास तब्बल दोन तासांचा अवधी लागला आणि तेवढय़ा वेळेत १० ते १५ सेवा रद्द झाल्या.
सोमवारी संध्याकाळी ४.४०च्या सुमारास ठाणे स्थानकाजवळ सायडिंगला उभी असलेली गाडी एक नंबर प्लॅटफॉर्मवर जात असताना या गाडीचा पेण्टोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. त्यामुळे ही गाडी बंद पडली. त्यामुळे ठाण्याच्या प्लॅटफॉर्म एकवर कोणतीही गाडी जाऊ शकत नव्हती. तसेच ही गाडी पुढे जाईपर्यंत मागून येणारी एक गाडीही रखडली. अखेर थोडय़ा वेळाने ही गाडी काहीशी पुढे करून घेत मागच्या गाडीचा मार्ग मोकळा करण्यात आला. तसेच पेण्टोग्राफ सोडवून गाडी कळवा येथील कारशेडला रवाना करेपर्यंत तब्बल दोन तासांचा अवधी गेला. अखेर संध्याकाळी ६.३०च्या सुमारास हा बिघाड दुरुस्त करण्यात आला.