ठाण्याहून निघालेली जलद गाडी धडाड् धडाड् अशी जात अगदी पंधरा मिनिटांत डोंबिवलीला पोहोचणे, हा आतापर्यंतचा रेल्वे प्रवाशांचा अनुभव इतिहासजमा झाला आहे. पूर्वी जलद गाडीने १५ मिनिटांत कापले जाणारे हे अंतर कापण्यासाठी सर्रास २० ते २२ मिनिटे लागत आहेत. याला कारण आहे मध्य रेल्वेवर झालेले डीसी-एसी विद्युतप्रवाहाचे परिवर्तन! डीसी-एसी परिवर्तनाच्या कामामुळे पारसिक बोगदा परिसरात जलद मार्गावर ताशी ५० किलोमीटरची वेगमर्यादा आली आहे. याआधी येथे गाडय़ा ताशी १०० किमी वेगाने धावत होत्या. त्यामुळे ठाणे-दिवा या टप्प्यात गाडय़ा निम्म्याच वेगाने धावत आहेत. परिणामी मध्य रेल्वेच्या जलद गाडय़ांच्या वेळापत्रकावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या दरम्यान जलद गाडीला लागणारी वेळ दोन मिनिटांनी कमी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र असे होण्याची शक्यता जवळपास नाही. कारण मध्य रेल्वेवर नुकतेच डीसी-एसी परिवर्तनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पारसिक बोगद्यात हे काम करण्यासाठी या बोगद्यातील रूळ खाली घ्यावे लागणार होते. त्याप्रमाणे हे रूळ काही इंचांनी खाली घेण्यात आले आहेत. मात्र, त्यामुळे या टप्प्यात ताशी १०० किमीऐवजी ५० किमीची वेगमर्यादा टाकण्यात आली आहे.
पारसिक बोगद्याचा टप्पा कोणत्याही क्रॉसओव्हरविना असल्याने तेथे फार सिग्नल नाहीत. त्यामुळे या टप्प्यात गाडी ताशी १०० किलोमीटर वेगाने पळणे सहज शक्य असते. मात्र डीसी-एसी परिवर्तनानंतर येथे वेगाला खिळ बसली आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य परिचालन व्यवस्थापक के. एन. सिंग यांनीच स्पष्ट केले. त्यामुळे उपनगरीय रेल्वेसेवांचे ठाणे-कल्याण दरम्यानचे वेळापत्रक पुरते कोलमडत आहे.
विशेष म्हणजे मुंबईत दादरच्या पुढील स्थानकांदरम्यान असलेल्या जुन्या पुलांदरम्यानही डीसी-एसी परिवर्तनाच्या कामासाठीच मध्य रेल्वेने रूळ काही इंचांनी खाली केले आहेत. त्यामुळे येथेही वेगावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-कल्याण प्रवासातील दोन मिनिटे वाचणार असल्याचा मध्य रेल्वेचा दावा साफ चुकीचा असल्याचे समोर येत आहे. वास्तविक डीसी-एसी परिवर्तनानंतर ठाणे-डोंबिवली या प्रवासासाठी जलद गाडीनेही २०-२२ मिनिटांचा वेळ लागत असल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी वारंवार केली आहे.