रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहे यांबाबत उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या खूप तक्रारी आल्यानंतर आता मध्य रेल्वेने मुंबई विभागातील प्रसाधनगृहांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात मध्य रेल्वेने ही पाणी सुरू केली असून त्या पाहणीतून प्रसाधनगृहांची सद्यस्थिती समोर येणार आहे.  काही महिन्यांपूर्वी महिलांनी सुरू केलेल्या ‘राईट टू पी’ या चळवळीदरम्यान रेल्वे स्थानकांमधील प्रसाधनगृहांच्या स्थितीवर टीका झाली होती. आता मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी-कर्मचारी मुंबई विभागातील सर्व स्थानकांवरील प्रसाधनगृहांची पाहणी करणार असल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. यात मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रसाधनगृहांचा समावेश असेल.