News Flash

मध्य रेल्वेचे वेळापत्रक घसरलेलेच

लोकल गाडय़ा सुरळीत ठेवण्यात अपयशच

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

लोकल गाडय़ा सुरळीत ठेवण्यात अपयशच; रेल्वे प्रवासी संघटनांचा आरोप

लोकल गाडय़ांच्या वक्तशीरपणात सुधारणा झाला असल्याचा दावा जरी मध्य रेल्वेकडून केला जात असला तरी गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना लोकलचे वेळापत्रक बिघडल्याचे दिसून येत आहे. त्यातही ऐन गर्दीच्या वेळी जलद लोकल गाडय़ांचा पूर्णपणे बोजवाराच उडालेला असतो. मध्य रेल्वेला लोकल गाडय़ांचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यास अपयशच येत असल्याचा आरोप प्रवासी संघटनाकडून करतानाच केल्या जाणाऱ्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांवरही प्रश्न उपस्थित केला आहे. डिसेंबरमधील १५ दिवसांतही लोकल गाडय़ा वेळेवर धावू शकलेल्या नाहीत. यातही तीन दिवस धुक्यामुळे लोकल गाडय़ा उशिराने धावत असल्या तरी उर्वरित १२ दिवसांत मध्य रेल्वे विस्कळीतच राहिली आहे.

२०१५-१६ मध्ये मध्य रेल्वेवरील लोकल गाडय़ांचा वक्तशीरपणा ८५.९० टक्के होता. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ८७.३० टक्के तर आता ९० टक्क्यांपर्यंत वक्तशीरपणा असल्याचा दावा मध्य रेल्वेकडून केला जातो. हा दावा जरी केला जात असला तरीही मध्य रेल्वेवरील लोकल गाडय़ांचे वेळापत्रक अनेक कारणास्तव बिघडतच आहे. लोकलमध्ये बिघाड, रुळाला तडा, ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक समस्या यांसह अन्य तांत्रिक बिघाड होत असल्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि सुटणाऱ्या लोकल गाडय़ा उशिरानेच धावतात. यातही जलद लोकल गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीतच असते. मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना प्रथम प्राधान्य देताना लोकल गाडय़ांना त्यानंतर मार्ग मोकळा केला जातो. त्यामुळे जलद लोकल गाडय़ांना थोडाफार उशीर होत असल्याचा दावा मध्य रेल्वेचे अधिकारी करतात. परंतु गेले काही महिने जलद लोकल गाडय़ांसह धिम्या लोकलचेही वेळापत्रक बिघडतच असल्याने हा दावा कितपत खरा आहे, यावरही प्रश्न उपस्थित होतो.

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख संघटक नंदकुमार देशमुख यांनी धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल उशिराने धावतात हे जरी खरे असले तरी त्याआधीपासूनही लोकल विविध कारणांनी उशिराने धावत असल्याचे सांगितले. तर डिसेंबर महिन्यात लोकल सेवा विस्कळीतच राहिली आहे. लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकाचे योग्य नसलेले नियोजन आणि देखभाल-दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष हे प्रमुख कारण ठरत असल्याचे ते म्हणाले.

काही वेळा गर्दीच्या वेळी लोकल गाडय़ा आणि तेही जलद लोकल उशिराने धावत असतात त्याचे कारण रेल्वेकडून स्पष्ट केले जात नाही. लोकल वेळेवर धावल्या पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी मध्य रेल्वेकडे करणार आहोत. त्याकडे दुर्लक्ष झाले तर प्रवासी संघटनांकडून निदर्शने केली जातील. रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनीदेखील मध्य रेल्वेकडून होणाऱ्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे. देखभाल-दुरुस्तीचे नियोजन होताना दिसत नाही. त्यांनी याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्या तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असून ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाडय़ांचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकचा फायदा काहीच नाही. लोकल गाडय़ा वेळेवर धावण्यासाठी आम्हीही पाठपुरावा करणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यातील बिघाडाच्या घटना

 • १ डिसेंबर- इंद्रायणी एक्स्प्रेसमधील इंजिनात वांगणी येथे बिघाड. सकाळी गर्दीच्यावेळी कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडय़ांचा गोंधळ.
 • १ डिसेंबर- सायंकाळी सातच्या सुमारास दिवा ते कोपर दरम्यान तांत्रिक समस्या. कल्याण, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावल्या.
 • ४ डिसेंबर- घाटकोपरजवळ तांत्रिक समस्या. रात्री अकराच्या सुमारास लोकल गाडय़ा उशिराने.
 • ६ डिसेंबर- दिवाजवळील पारसिक बोगद्याजवळच एका मालगाडीच्या डब्याचे चाक रुळावरून घसरले. सायंकाळी पावणेचार वाजता घडलेल्या घटनेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल गाडय़ांचा गोंधळ. लोकल सुरळीत होण्यासाठी तब्बल साडेतीन तास लागले. जवळपास १०० पेक्षा अधिक लोकल फेऱ्यांना फटका
 • ७ डिसेंबर- धुक्यामुळे लोकल गाडय़ा अर्धा तास उशिराने.
 • ७ डिसेंबर- वडाळा ते जीटीबी स्थानकादरम्यान रुळाला तडा
 • ८ डिसेंबर- धुक्यामुळे लोकल गाडय़ा उशिराने
 • ९ डिसेंबर- धुक्यामुळे लोकल गाडय़ा उशिराने
 • ११ डिसेंबर- कुर्ला येथे लोकलमध्ये बिघाड.
 • १२ डिसेंबर- चेंबूर स्थानकाजवळ दोन रुळांना जोडणारी पट्टी तुटली. अप दिशेला येणाऱ्या लोकल विस्कळीत.
 • १३ डिसेंबर- गोवंडी स्थानकाजवळ रुळांचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने हार्बर विस्कळीत
 • १४ डिसेंबर- बेलापूर ते सीवूड दरम्यान रुळांचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने हार्बर विस्कळीत
 • १५ डिसेंबर- वांगणी दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याची घटना. ऐन रात्री गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे कर्जत, खोपोलीकडे जाणारी वाहतूक खोळंबली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:01 am

Web Title: central railway time table 2
Next Stories
1 वाहनतळ धोरणाच्या प्रयोगाला सुरुवात
2 विद्यार्थ्यांना पुरवणी द्या!
3 विमानतळ मेट्रोने जोडणार
Just Now!
X