सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक इमारत पाडण्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर मध्य रेल्वेने आता अशा रेल्वेमार्गाजवळच्या इमारतींबाबत सावध पवित्रा घेतला आहे. रेल्वेमार्गाला लागून असलेल्या इमारती, संरक्षक भिंती यांचे सर्वेक्षण मध्य रेल्वेचे काही अधिकारी करणार आहेत. या सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सादर करणार आहे. यात मस्जिद ते भायखळा, हार्बर मार्गावरील गुरू तेगबहाद्दूर नगर, घाटकोपर, मुंब्रा या परिसराचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील थोरात हाऊस या इमारतीचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळून रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर ही इमारत पाडण्याची मागणी मध्य रेल्वेने पालिकेकडे केली होती. पालिकेने दाद न दिल्याने अखेर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांनी रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला. त्यानंतर पालिकेने कारवाई करून थोरात हाऊस जमीनदोस्त केली. या घटनेवरून धडा घेत आता मध्य रेल्वेने आणखी सावध पवित्रा घेत रेल्वेमार्गाजवळच्या इमारती आणि संरक्षक भिंती यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणांतर्गत सर्वप्रथम मस्जिद ते भायखळा या स्थानकांदरम्यानच्या जून्या इमारती आणि संरक्षक भिंती यांची पाहणी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकातर्फे करण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील गुरू तेगबहाद्दूर नगर, घाटकोपर, कुर्ला, मुंब्रा-दिवा या स्थानकांदरम्यानच्या संरक्षक भिंती आणि इमारती यांचे सर्वेक्षण होणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. या सर्वेक्षणानंतर त्याचा अहवाल संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सादर केला जाईल. त्यानंतर या इमारती व भिंती यांबाबतचा निर्णय होणार आहे.