लोकलगाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करून अतिरिक्त फेऱ्या; गोरेगाव-पनवेल थेट लोकलसेवेचाही विचार

मुंबई: मध्य रेल्वे मुख्य मार्गावर लोकल गाडय़ांचे नवीन वेळापत्रक लागू झाल्यानंतर आता सीएसएमटी ते पनवेल, अंधेरी या हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरही सुधारित वेळापत्रक एप्रिल २०२० पासून लागू केले जाणार आहे. यात सध्याच्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या नवीन वेळापत्रकात अतिरिक्त म्हणून चालवण्याचा विचार असून प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय हार्बरवर अंधेरी ते पनवेल असलेल्या लोकल फेऱ्या गोरेगावपासूनही चालवण्यासाठी वेळापत्रकावर काम सुरू केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाणे ते पनवेल मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू झाली. या लोकलच्या दिवसाला १६ फेऱ्या चालवताना सामान्य लोकलच्या फेऱ्या मात्र रद्द करण्यात आल्या. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याऐवजी वातानुकूलित लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या म्हणून चालवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. याची दखल रेल्वे प्रशासनाने नव्या वेळापत्रकात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. एप्रिल २०२० पासून हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर लोकलचे नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. या वेळापत्रकावर मध्य रेल्वेकडून काम सुरू आहे. सध्याच्या वातानुकूलित लोकल गाडीला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसादाची माहिती मध्य रेल्वेकडून घेतली जात आहे. प्रवाशांकडून अल्प प्रतिसादच राहिला तर वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा अतिरिक्त म्हणून नवीन वेळापत्रकात समावेश केला जाईल. तर रद्द झालेल्या १६ फेऱ्या या पुन्हा पूर्ववत करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती देण्यात आली.

सध्या सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत ८६ लोकल फेऱ्या अप-डाऊन करतात. तर अंधेरी ते पनवेल अप व डाऊन १८ लोकल फेऱ्या होतात. अंधेरीपर्यंत असणाऱ्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार गेल्या वर्षी केल्यानंतरही गोरेगाव ते पनवेल लोकल फेऱ्या अद्यापही सुरू होऊ शकल्या नाहीत. यात जोगेश्वरी, गोरेगाव स्थानकाजवळ लोकल उभे करण्यासाठी (सायडिंग) तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळेच गोरेगावपासून पनवेलसाठी लोकल सेवा सुरू होऊ शकत नव्हती. पश्चिम रेल्वेकडून त्याला मंजुरीही मिळत नव्हती. मात्र हा तिढा सुटला असून पश्चिम रेल्वेने मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गोरेगावपासून पनवेलसाठी लोकल धावणे शक्य होणार आहे. सध्या अप-डाऊन १८ फेऱ्या अंधेरी ते पनवेलसाठी होत असून यातील कोणत्या फेऱ्यांचा विस्तार करणे शक्य आहे, त्यावर काम सुरू असल्याचे सांगितले.