31 May 2020

News Flash

कसारा-खोपोलीच्या रेल्वे प्रवाशांना दिलासा, दोन महिन्यात मार्गी लागणार ‘हा’ प्रकल्प

कल्याणपुढे खोपोली किंवा कसारापर्यंत गर्दीच्या वेळेतील प्रवास अगदीच कंटाळवाणा होतो...

(संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेच्या बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, आसनगाव, कसारा या स्थानकादरम्यान दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढतेय. ही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत कल्याणच्या पुढे बदलापूर, आसनगाव, खोपोली, कसारापर्यंत १५ डब्याची जलद लोकल चालविण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना आर्थिक बळ लाभलंय. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने याकरिता निधी देण्याची परवानगी दर्शवली आहे. त्यामुळे, हा प्रकल्प दोन ते तीन महिन्यांत मार्गी लागण्याची शक्यता असून या मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे ठाणे ते खोपोली, कसारादरम्यान असलेल्या स्थानकातून गर्दीच्या वेळी प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. कल्याणपुढे खोपोली किंवा कसारापर्यंत जलद लोकल गाड्या धीम्या होतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेतील प्रवास अगदीच कंटाळवाणा होतो. एकूणच या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुकर व जलद करण्यासाठी मध्य रेल्वेने वर्षभरापूर्वी पंधरा डबा जलद लोकल चालवण्याचे नियोजन सुरू केले. तसा प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडेही पाठवला. त्याला मंजुरी मिळाली असून आता या प्रकल्पाला मुंबई रेल्वे विकास महामंडळानेही (एमआरव्हीसी) निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पाची किंमत ही ४९० कोटी रुपये आहे.

या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यात कल्याण ते बदलापूर, दुसऱ्या टप्प्यात कल्याण ते आसनगाव आणि तिसऱ्या टप्प्यात बदलापूर ते खोपोली आणि आसनगाव ते कसारा असे काम केले जाईल. यामध्ये फलाटांची लांबी वाढवणे, ओव्हरहेड वायरसह अन्य तांत्रिक कामे केली जातील. बारा डबा लोकल गाडय़ांना आणखी तीन डबे जोडून त्याचे पंधरा डब्यांत रूपांतर केले जाणार आहे. त्यामुळे सध्या सीएसएमटी ते कल्याण ते सीएसएमटी धावणाऱ्या जलद लोकल बदलापूर, आसनगाव, खोपोलीपर्यंत धावतील. शिवाय आणखी पंधरा डबा लोकल चालवणेही शक्य होईल. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी हे काम तीन टप्प्यांत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘सीएसएमटी स्थानकातील पाचवा आणि सहाव्या फलाटाची लांबीही वाढवण्याचे काम केले जाणार आहे. याशिवाय अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा, कसारा, खोपोली येथील यार्ड रिमॉडेलिंगही केले जाईल,’ असेही ते म्हणाले.

सध्या दोनच गाड्या –

साधारण दहा वर्षांपूर्वी मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण पंधरा डबा जलद लोकल गाडी धावली. आता आणखी एक पंधरा डबा लोकल या मार्गावर चालवली जात आहे. दोन लोकलच्या दिवसभरात २२ फेऱ्या होतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 10:02 am

Web Title: central railway to run 15 car fast local towards kasara karjat khopoli asangaon badlapur sas 89
Next Stories
1 महाविद्यालयीन महोत्सवांवरही मंदीचे मळभ
2 कचराभूमीवर पुन्हा पाण्याचे फवारे
3 ‘पिंक अर्बन’ प्रसाधनगृह वर्षभरापासून बंद
Just Now!
X