वृद्ध, अपंग, गर्भवती महिलांसाठी सुविधा

गरोदर महिला, वृद्ध प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेकडून ‘एमआरव्हीसी’च्या साहाय्याने स्थानकात उद्वाहक बसविण्यात येत आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेच्या १२ स्थानकांत आणखी २५ उद्वाहक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च २०१८ पर्यंत या उद्वाहक बसविण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) ठेवले आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात असणारे पादचारी पूल चढताना वृद्ध, गरोदर महिला आणि अपंग प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात सरकते जिने आणि उद्वाहक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यातील मध्य रेल्वेवर २२ सरकते जिने आणि १३ लिफ्ट काही स्थानकांत बसविण्यात आल्या. उद्वाहक बसविलेल्यांमध्ये सीएसएमटी, ठाणे, कल्याणसारख्या स्थानकांचा समावेश आहे. सरकत्या जिन्यांची कामे जेवढय़ा जलद गतीने सुरू झाली, त्यामानाने लिफ्टच्या कामांना मात्र गती देण्यात रेल्वेला यश आले नाही. पादचारी पुलांना जोडतानाच त्यासाठी लागणारी जागा आणि येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळेच उद्वाहक बसविताना बरेच अडथळे येत असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. तांत्रिक समस्या सोडवत अखेर मार्च २०१८ पर्यंत १२ स्थानकांत २५ उद्वाहक मध्य रेल्वे स्थानकांत बसविण्यात येणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेकडून १२ आणि एमआरव्हीसीकडून १३ उद्वाहकांचे नियोजन आहे. सर्वाधिक लिफ्ट ठाणे, चेंबूर, वडाळा स्थानकांत असतील, असे सांगण्यात आले. ठाणे स्थानकात चार, चेंबूर व वडाळा स्थानकात प्रत्येकी तीन उद्वाहक बसविण्यात येणार आहेत.

विस्तार करणार

मध्य रेल्वेकडून अन्य स्थानकांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवर एक, दादर स्थानकात दोन, डोंबिवली स्थानकात एक, ठाणे स्थानकात चार, कल्याण स्थानकात दोन आणि लोणावळा स्थानकात एक उद्वाहक बसवला जाणार आहे, तर एमआरव्हीसीकडून डॉकयार्ड रोड स्थानकात एक, रे रोड स्थानकात दोन, वडाळा स्थानकात तीन, टिळकनगर स्थानकात दोन, चेंबूर स्थानकात तीन आणि मानखुर्द स्थानकात दोन उद्वाहकांचा समावेश आहे.

लोणावळ्यापर्यंत सुविधा

आजघडीला २२ सरकते जिने मध्य रेल्वे स्थानकांवर बसविण्यात आले आहेत. तर मार्च २०१८ पर्यंत आणखी ५२ सरकते बसविण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये सीएसएमटी, दादर, एलटीटी, नाहूर, मुलुंड, कळवा, ठाणे, दिवा, कल्याण, कर्जत, कसारा, लोणावळा, डॉकयार्ड, वडाळा, मानखुर्द, चेंबूर, पनवेल यांसह अन्य काही स्थानकांचा समावेश आहे.