गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असताना रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. भांडुप ते कांजूरमार्गादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

सोमवारी विघ्वहर्त्यां गणेशाचे आगमन होत असून स्वागताच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहेत. मेगा ब्लॉक असल्याने नागरिकांना आधीच समस्यांना सामोर जाव लागत असून मध्य रेल्वे मार्गावर आणखी एक विघ्न निर्माण झाले. रविवारी सकाळी मध्य रेल्वेवरील भांडुप ते कांजुरमार्ग स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले. याचा परिणाम जलद आणि धिम्या मार्गावरील लोकल सेवेवर झाला आहे. तसेच मध्य रेल्वेची घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूकही उशिराने सुरू आहे. मेगा ब्लॉकबरोबरच आज लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.