रोज ‘मरे’… त्याला कोण रडे, असं म्हणत सर्वसामान्य प्रवासी मध्य रेल्वेचा उल्लेख करतात. पण, मुळात हे असं का होतं, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. रेल्वे अप्रेंटिस विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी दादर- माटुंगा या स्थानकादरम्यान रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाकरता मोठ्या संख्येने विद्यार्थी रेल्वे रुळांवर एकत्र आले आणि पुन्हा एकदा ‘मरे’ची गाडी रुळावरुन घसरली. कामावर जायच्याच वेळी या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या लाईफलाईनचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळालं.

कल्याणहून सीएसटीकडे येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. दादरहून कर्जत- कसारा येथे जाणाऱ्या लोकलवरही याचा परिणाम झाला. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ लोकलमध्येच अडकल्यामुळे नोकरदार वर्गातील अनेकांनीच ऑफिसला न जाण्याचा निर्णय घेतला तर कोणी ऑफिसला पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.

वाचा : आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे दिसते, मग प्रशासनाला माहिती का नाही? – अरविंद सावंत

मुंबईकरांचे हे हाल पाहता काही ऑफिसांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली त काही कर्मचाऱ्यांनी स्वत:च कामाला सुट्टी देत अचानकच काही बेत आखत भटकण्याचे बेत आखल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे प्रवाशांचे हाल होत असले तरीही नेहमीच्याच परिस्थितीवर उपाय काढत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनेक युवा कर्मचाऱ्यांनी दादर आणि आसपासच्या परिसरात किंवा ते ज्या ठिकाणी अडकले आहेत, त्या स्थानकांच्या जवळपास असणाऱ्या मॉल, चित्रपटगृह, हॉटेल्समध्ये जाण्याला प्राधान्य दिलं.

अनेक ऑफिसच्या वॉट्स अॅप ग्रुप्सवर वरिष्ठांनी सांगितलेले उपाय शेअर केले जात होते. पण, काहींनी मात्र कामाच्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या वरिष्ठांना संपूर्ण परिस्थितीचे ‘दाहक’ वास्तव पटवून देण्यासाठी रेल्वेत अडकल्याचे व्हिडीओ व्हॉट्सअप केल्याचेही दिसून आले. ज्यामुळे सुट्टीला कारणच मिळालं. त्यामुळे एक प्रकारे आंदोलनाच्या या तणावग्रस्त प्ररिस्थितीला डच्चू देत अनोख्या मार्गाने तोडगा काढल्याचं पाहायला मिळालं.