ऐन गर्दीच्या वेळी रुळाला तडा गेल्याने प्रवाशांचे हाल
दादर-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला गुरुवारी सायंकाळी तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. ऐन सायंकाळी ही घटना घडल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होत असून सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडत आहेत. गुरुवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला मोठा तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे डाऊन जलद मार्गावरील वाहतूक भायखळा स्थानकापासून पुढे धिम्या मार्गावर वळवण्यात आली. याने मध्य रेल्वेवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याने लोकल गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दुरुस्तीचे काम दोन तास चालल्याने मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे या स्थानकांवर ऐन सायंकाळी या वेळेत मोठय़ा प्रमाणावर गर्दी जमली होती. तसेच, वाहतूक धिम्या मार्गावर वळवल्याने या गाडय़ाही प्रवाशांनी भरून गेल्या होत्या. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल याची नीट माहिती न मिळाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
अखेर ७ वाजून ५४ मिनिटांनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने ही वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र, याचा परिणाम मध्य रेल्वेवरील अन्य लोकल सेवांवर झाल्याने गाडय़ा काहीशा उशिराने धावत होत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 2:26 am