मंगळवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईतील प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. मध्य रेल्वेवर सीएसटीएमकडे येणाऱ्या  लोकल गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरु आहे. स्थानकांवर गाड्या उशिराने का धावत आहेत, याबाबत उद्घोषणा केली जात नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे.

मध्य रेल्वेवर मंगळवारी सकाळी सीएसटीएमकडे येणाऱ्या जलद मार्गावर लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्यांची वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होती. यामुळे प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. स्थानकांवर उद्घोषणाही केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. तसेच ठाण्यातून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल गाड्याही उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विलंबाने सुरु असल्याचे समजते.

दरम्यान, सोमवारी रात्री मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले होते. पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. ठाणे, नवी मुंबई, बदलापूरसह अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडीत झाला होता.