News Flash

मध्य रेल्वे १० तास ठप्प

चुनाभट्टी तसेच वडाळा ते किंग्ज सर्कल दरम्यानही रुळांवर पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी, वांद्रे, गोरेगाव लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.

छाया : गणेश शिर्सेकर

पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत

मुंबई: दिवसभर मुसळधार पाऊस पडत असतानाही पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत सुरू राहिली, परंतु तीन ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्ग व हार्बरवरील लोकल सेवा सुमारे दहा तास ठप्पच राहिली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.

शीव ते कु र्ला दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने प्रथम सकाळी ९.५० वाजता सीएसएमटी ते कु र्ला लोकल सेवा बंद करण्यात आली. परंतु पावसाचा जोर व रुळांवरील पाणी वाढल्याने वाढल्याने त्यापाठोपाठ सीएसएमटी ते ठाणे लोकल सेवा बंद केली गेली. कामानिमित्त सकाळी लोकल पकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले. काही लोकल दोन स्थानकांदरम्यान उभ्या राहिल्याने लोकलमधून उतरून भर पाण्यातून रुळांवरून वाट काढत प्रवाशांनी जवळचे स्थानक गाठले.  पावसात रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बस  मिळवतानाही अनेकांची त्रेधातिरपीट उडाली.

दादर ते अंधेरी पट्ट्यात ३०० मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसातही पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत सुरू होती, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. माटुंगा रोड ते माहिम दरम्यान डाऊन मार्गावर काही वेळ पाणी साचले. मात्र पाण्याची पातळी जास्त नसल्याने लोकल गाड्या ताशी २५ किमी वेगाने या पट्टयातून चालवण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

चुनाभट्टी तसेच वडाळा ते किंग्ज सर्कल दरम्यानही रुळांवर पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी, वांद्रे, गोरेगाव लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचीही कसोटी लागली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे ते कर्जत, कसारा आणि वाशी ते पनवेल सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेने साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ठिकठिकाणी रेल्वे रुळांजवळ पंप मशीन लावले होते. सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने रुळांवरील पाणी ओसरले, त्यानंतर सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा दरम्यान धीम्या मार्गावरील आणि जलद मार्गावरीलही लोकल वाहतूक रात्री पावणे आठ वाजता सुरू करण्यात आली. तर सीएसएमटी ते वांद्रे, गोरेगाव हार्बर मार्गही पूर्ववत झाला.

  •  सकाळी ठाणे ते पनवेल, नेरुळ, बेलापूर ते खारकोपर या लोकल सेवा मुसळधार पावसातही सुरू होत्या.
  • पश्चिम रेल्वेवर माहिम ते माटुंगा दरम्यान काही प्रमाणात रुळांवर पाणी साचल्याने येथून लोकल गाड्यांच्या वेगावर मर्यादा आणून त्या चालवण्यात आल्या.
  • मध्य रेल्वे मुख्य मार्ग व सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर पूर्ववत झाली तरी रात्री वडाळा ते मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून सुरू होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:27 am

Web Title: central railway western railway local train heavy rain fall akp 94
Next Stories
1 ‘बेस्ट’ बस चालकाची छत्रीसह प्रवास कसरत
2 ओळखपत्र नसलेल्यांचे लसीकरण कसे करणार?
3 मुंबईत करोनाचे ७८८ नवे रुग्ण
Just Now!
X