मुंबई उपनगरीय रेल्वेचे १,३३९ कोटी, तर एसटीचे ३,८०० कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई : गेल्या वर्षी मार्चपासून करोनामुळे लागलेली टाळेबंदी, प्रवासावरील निर्बंध आणि करोना संसर्गाच्या धास्तीमुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे, बेस्ट, एसटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेला वर्षभरात तब्बल एक हजार ३३९ कोटी रुपये आर्थिक फटका बसला आहे. बेस्ट उपक्र माला १,८०० कोटी, तर एसटी महामंडळाला ३,८०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

मार्च २०२० पासून करोनाचा संसर्ग वाढू लागला आणि मध्य, पश्चिम रेल्वे, एसटी, बेस्टचे प्रवासी कमी होऊ लागले. मार्च अखेरीस टाळेबंदी लागली. यामध्ये उपनगरीय रेल्वे सेवा बंद झाली व रेल्वेला प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. जूनपासून टप्प्याटप्प्याने प्रवासाची परवानगी देण्यात आली तरीही सामान्य प्रवाशांना ठरावीक वेळेत प्रवासाची मुभा दिली. त्यामुळे करोनाची साथ येण्यापूर्वी मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ८० लाखांवरून ३९ लाखांपर्यंत कमी झाली आहे. परिणामी मध्य रेल्वेला ७०३ कोटी रुपये, तर पश्चिम रेल्वेला ६३६ कोटी रुपये तोटा झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. २०१९-२० मध्ये मध्य रेल्वेला ८२४ कोटी आणि पश्चिम रेल्वेला ७५४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. हेच उत्पन्न २०२०-२१ मध्ये कमी झाले आहे. मुंबई महानगरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा प्रवासी व उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.

उत्पन्नासाठी अन्य पर्याय

एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत पश्चिम रेल्वेला अवघे १०० कोटी, तर मध्य रेल्वेलाही १२१ कोटी ४० लाख रुपये उत्पन्न  तिकीट व पास यांतून मिळाले. त्यामुळे उत्पन्न मिळविण्यासाठी रेल्वेकडून अन्य पर्यायही निवडण्यात येत आहेत. यात विजेवरील वाहनांसाठी चार्जिंग सुविधा, त्या वाहनांसाठी पार्किं ग, सर्व सुविधायुक्त प्रतीक्षालय यांसह अन्य पर्यायांचा समावेश आहे.

एसटी आणखी संकटात

आधीच आर्थिक स्थिती बेताची बनलेली असतानाच कोनामुळे एसटी आणखी संकटात सापडली. उत्पन्न बुडल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले. परिणामी, राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरच अवलंबून राहावे लागले. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्याने एसटीचे तीन हजार ८०० रुपये उत्पन्न बुडल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. त्याआधीच्या वर्षी पाच हजार ८०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा सुमारे दोन हजार कोटी रुपये कमी उत्पन्न मिळाले आहेत.

बेस्टला आर्थिक चणचण

गेल्या वर्षभरात बेस्टला के वळ ३९८ कोटी २६ लाख रुपये मिळाले असून खर्च दोन हजार २५७ कोटी ७५ लाख रुपये झाला आहे. बेस्टला एक हजार ८५९ कोटी ४९ लाख रुपये नुकसान सोसावे लागले, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.