News Flash

मध्य रेल्वे इतिहासाच्या पुस्तकखुणा जपणार!

रेल्वेगाडी चालवण्याचा मान असलेल्या मध्य रेल्वेने आपल्या इतिहासाच्या खुणा जपण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील पहिली रेल्वेगाडी चालवण्याचा मान असलेल्या मध्य रेल्वेने आपल्या इतिहासाच्या खुणा जपण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील पहिली रेल्वेगाडी चालवण्याचा मान असलेल्या मध्य रेल्वेने आपल्या इतिहासाच्या खुणा जपण्याचा निर्णय घेतला आहे. १९२५ ते १९३५ या दहा वर्षांच्या काळात दर महिन्याला प्रसिद्ध झालेले रेल्वे मासिकाचे अंक मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे धूळ खात पडून होते. आता या अंकांचे डिजिटायझेशन करून हा इतिहास जपला जाणार आहे. या अंकांमध्ये त्या दहा वर्षांमध्ये रेल्वेत झालेल्या घडामोडी, त्या अनुषंगाने भारतीय समाजावर झालेले परिणाम यांचे रंजक चित्रण केले असल्याने ऐतिहासिकदृष्टय़ा हा ऐवज महत्त्वपूर्ण आहे.
भारतीय रेल्वेवर विद्युत प्रवाहावर धावलेली पहिली गाडी फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबईतच सुरू झाली. १९२५ मध्ये जानेवारीत प्रसिद्ध झालेल्या रेल्वेच्या मासिकात या गाडीबद्दल सगळी माहिती देणारा लेख आला होता. त्याशिवाय त्या त्या वेळी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली प्रशंसनीय कामगिरी, तत्कालीन जीआयपी रेल्वेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पर्यटनस्थळांना झालेली रेल्वेची मदत आदी गोष्टी या मासिकांमधील लेखांमध्ये आढळतात. प्रत्येक वर्षांची मासिके एका पुस्तकात संकलित करून अशी दहा पुस्तके सध्या उपलब्ध आहेत. मात्र ही पुस्तके जराजीर्ण अवस्थेत असून त्यांना कसर लागली आहे.
ही सर्व पुस्तके एकत्रित करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यासाठी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक ए. के. श्रीवास्तव यांनी पुढाकार घेतला आहे. भारतीय रेल्वेवर पहिली गाडी ज्या मध्य रेल्वेवर धावली, त्या रेल्वेचा इतिहास जपायला हवा. त्यासाठी आता या दहा वर्षांच्या काळातील मासिके संगणकावरही उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. रेल्वेविषयी अनेक गोष्टी या मासिकांमधून आम्हा अधिकाऱ्यांनाही नव्यानेच कळत आहेत. ही प्रक्रिया केवळ मासिकांपुरतीच मर्यादित ठेवणार नसून रेल्वे स्थानकांच्या आसपास किंवा स्थानकांत पडून असलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी एकत्र करण्यात येणार असल्याचे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

मध्य रेल्वेने इतिहासाचे जतन करण्याचे काम खूप आधीपासूनच करायला हवे होते. अजूनही बऱ्याच गोष्टी पडून आहेत. ब्रिटिशांनी या मासिकांमधून अनेक पुलांचे, इमारतींचे आराखडे प्रसिद्ध केले होते. ही मासिके इंग्लंडमध्येही पाठवली जात होती. तेथील अभियंते या आराखडय़ांबाबत आपली मते द्यायचे. लोकांना पाहण्यासाठीही ही मासिके खुली होती. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा महत्त्वाचा आहे. उशिराने का होई ना, मध्य रेल्वेने तो जपण्यास सुरुवात केली हे स्तुत्य आहे.
– राजेंद्र आकलेकर , (रेल्वे इतिहासकार आणि अभ्यासक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 2:59 am

Web Title: central railways deciding to preserve books with historical value
Next Stories
1 जलद गाडय़ांच्या थांब्याला रेल्वे फाटकाचा अडसर!
2 पालिकेचा एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प
3 रेल्वेलगतच्या वस्त्यांमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांचे समुपदेशन वर्ग!
Just Now!
X