मध्य व पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या वातानुकूलित लोकलच्या गोंधळाचा फटका

मुंबई : मध्य व पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलना मिळणारा थंड प्रतिसाद, इतर फेऱ्यांच्या वेळापत्रकावर झालेला परिणाम यामुळे उर्वरित ४७ वातानुकूलित गाडय़ांच्या बांधणीचे काम थांबल्यात जमा आहे. या गाडय़ा अर्ध वातानुकूलित की पूर्ण वातानुकूलित याबाबत असलेल्या गोंधळाचा फटकाही गाडय़ांच्या निर्मितीच्या कामाला बसतो आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास महामंडळ)जवळपास ११ हजार कोटी रुपयांच्या एमयूटीपी-३ ला मंजुरी मिळाली होती. यात ४७ वातानुकूलित लोकल प्रकल्पाचाही समावेश आहे. या लोकलची बांधणी चेन्नईतील रेल्वे कारखान्यात केली जाणार आहे. या लोकल प्रथम पनवेल ते कर्जत दुहेरी उपनगरीय मार्ग आणि विरार ते डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात चालवल्याचे नियोजन होते. मात्र या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना प्रतिसाद न मिळाल्याने दोन वेळा निविदा काढण्याशिवाय एमआरव्हीसीला पर्याय राहिला नाही. त्यामुळे आपोआपच ४७ वातानुकूलित लोकलचा प्रकल्पही लांबण्यास सुरुवात झाली.

आता यात आणखी भर पडली ती मध्य व पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या गोंधळाची. पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल सेवेत येऊन दोन वर्षे झाली. त्याला प्रवाशांकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याचेच समोर आले. त्यामुळे अर्ध वातानुकूलित लोकलचा पर्याय समोर आला. त्यावरही रेल्वे बोर्डाकडून ठाम भूमिका घेण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेवरही वातानुकूलित लोकल आल्यानंतर त्यालाही प्रतिसाद नाही. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण २९ वातानुकूलित लोकल भेल कंपनीच्या येणार असून यातील १२ लोकलचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र मध्य रेल्वेही पहिल्या वातानुकूलित लोकल गाडीला मिळालेल्या प्रतिसादानंतर येणाऱ्या आणखी काही लोकल चालवण्यास धास्तावले आहे. त्यामुळे या वातानुकूलित लोकल लवकर दाखल करण्यासंदर्भात निर्णय झाला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अन्य मार्गावर चालवण्याचा पर्याय

पनवेल ते कर्जत दुहेरी उपनगरीय मार्ग आणि विरार ते डहाणू चौपदरीकरण हे एमयूटीपी-३ मधीलच प्रकल्प आहेत. पण या प्रकल्पांच्या एकाही कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. केवळ निविदांवरच भर दिला आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकल गाडय़ाही येण्यास उशीर होत आहे. या नव्या मार्गिकांवर वातानुकूलित लोकल चालवण्याचे उद्दिष्ट होते. मात्र प्रकल्पांना विलंब होत असल्याने आता अन्य मार्गावरही या लोकल चालवण्याची तयारी एमआरव्हीसीने ठेवली आहे.