खासगी रुग्णालये-हॉटेल्सच्या ‘लस पॅकेज’वर केंद्राचा अंकुश

मुंबई : काही खासगी रुग्णालये आणि हॉटेल्सनी संधान बांधून लसीकरण मोहिमेचा वापर आपल्या व्यवसायवृद्धीसाठी सुरू के ला आहे. परंतु अशा प्रकारांमुळे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट करत केंद्रीय आरोग्य विभागाने त्यावर बंदी घातली आहे.

मुंबईत एका मोठय़ा हॉटेलने ‘लस घ्या आणि आमच्याकडे आराम करा’ अशी जाहिरातबाजी सुरू केली आहे. यात दोन प्रकारच्या योजना देण्यात आल्या आहेत. पहिल्या योजनेची किंमत साडे तीन हजार रुपये असून यात ३ ते चार तास खोलीत आराम करण्यासह जेवणाची सोय देण्याचे जाहीर करण्यात आले होते. दुसऱ्या योजनेत एक रात्र राहण्यासह जेवणाची सोय असून यासाठी पाच हजार रुपये आकारले जातील असे जाहीर करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर त्याच दिवशी या सुविधा दिल्या जाणार असून त्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे आहे, असे या जाहिरातीत स्पष्ट केले आहे.

खासगी रुग्णालयांनी अशा रितीने हॉटेलच्या मदतीने सुरू केलेल्या योजनांवर के ंद्रीय आरोग्य विभागाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत अशा रितीने लसीकरण करणे चुकीचे असल्याचे आदेश आरोग्य विभागाने राज्यांना दिले आहेत. तसेच सरकारी लसीकरण केंद्र, खासगी रुग्णालयाद्वारे चालविले जाणारे खासगी केंद्र, सरकारी कार्यालांमधील सरकारी रुग्णालयांमार्फत चालविले जाणारे केंद्र, खासगी कार्यालयांमध्ये खासगी रुग्णालयांद्वारे चालविले जाणारे केंद्र, सामाजिक केंद्र, पंचायत, शाळा, महाविद्यालये, गृहसंकुल येथे ज्येष्ठ नागरिक आणि अपंगाच्या लसीकरणासाठी तात्पुरती सुरू केलेली केंद्रे याच ठिकाणी लसीकरण केले जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी लसीकरणाचे आयोजन करणे नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मोठय़ा हॉटेलने आयोजित केलेले लसीकरण कार्यक्र म तातडीने बंद करावे आणि यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश विभागाने राज्यांना दिले.

क्रिटीकेअर रुग्णालयाची चौकशी : महापौर

महापौरांनी या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला आहे. ललित मध्ये क्रिटीकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जाते. येथील लस साठवणूकीच्या पद्धतीबाबत साशंकता निर्माण झाल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. यात क्रिटीकेअर रुग्णालयाचीही चौकशी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

ललितहॉटेलमध्ये साठवणूक अयोग्य पद्धतीने 

मुंबईतील ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलच्या पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांना समाजमाध्यमांद्वारे मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी अचानक पाहणी केली. त्यावेळी लशींच्या शीतपेटय़ांचे व्यवस्थापन अयोग्य असल्याचे निदर्शनास आले. घरगुती वापराच्या शीतगृहात लशीचा साठा करण्यात आला होता. तसेच आईस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. या हॉटेलमधील लशींच्या साठय़ाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.