29 January 2020

News Flash

मध्य रेल्वेची योजना; रेल्वेसेवा मुरबाड, अलिबागपर्यंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सुविधांचे उद्घाटन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सुविधांचे उद्घाटन
  • उपनगरीय रेल्वेसाठी १८० सरकते जिने, चिखलोली नवीन स्थानकही मंजूर
  • धारावी झोपडपट्टी पुनर्विकासासाठी रेल्वेची ४५ एकर जमीन

उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार मुरबाड आणि अलिबागपर्यंत करण्याची योजना मध्य रेल्वेने आखली आहे. पेण ते अलिबाग कॉरीडोरचे काम गतीमान करण्यात येत असून कल्याण ते मुरबाड या मार्गालाही रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रविवारी दिली.

परळ टर्मिनस, १५ डबा लोकल, पुणे ते नागपूर ‘हमसफर एक्सप्रेस’ या सेवांचे उद्घाटन तसेच पेण ते थळ आणि जासई-उरण विद्युतीकरण, कुर्ला, सायन, दिवा, जीटीबी नगर, महालक्ष्मी आणि पालघर स्थानकात पादचारी पूल, नेरळ ते माथेरान गाडीला पारदर्शक डबा इत्यादी सुविधा फडणवीस आणि गोयल यांच्या हस्ते रविवारी सुरू करण्यात आल्या. त्यावेळी दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. अलिबाग ते मुंबई हा प्रवास जलद व्हावा, यासाठी अलिबाग ते पेण असा मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यावरून पॅसेंजर गाडय़ा धावतील. त्यामुळे हा प्रवास वेगवान होईल. या प्रकल्पावर काम सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या बाबतीत आम्ही केलेल्या मागण्या रेल्वेमंत्री गोयल यांनी मान्य केल्या. रेल्वेमंत्र्यांनी कल्याण ते मुरबाड या ७२६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. एमयुटीपी-३ आणि ३ ए या योजना मुंबईचे चित्र बदलणाऱ्या असतील. त्यामुळे लोकल गाडय़ा वाढतील, त्यांच्या फेऱ्याही वाढतील आणि प्रवासी क्षमताही वाढेल. यासाठी अर्थसंकल्पात तर ५५ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

‘उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांच्यासह अन्य परिवहन सेवांसाठी लवकरच एकात्मिक तिकिट प्रणाली आणण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांसाठी आणखी १८० सरकते जिनेही मंजुर करण्यात आले आहेत. याशिवाय बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान नवीन चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी दिल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

परळ टर्मिनसमधून १६ फेऱ्या

परळ टर्मिनसचेही रविवारी उदघाटन करण्यात आले. परळ टर्मिनसमधून सोमवार, ४ मार्चपासून ३२ लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. दादर स्थानकापर्यंत येणाऱ्या आणि दादरमधून सुटणाऱ्या ३२ फेऱ्यांचा विस्तार परळ टर्मिनसपर्यंत झाला आहे. सध्या पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. तिचा विस्तार सुरतपर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. मध्य रेल्वे उपनगरी सेवेचा विस्तार नाशिकपर्यंत करण्याचा प्रयत्न आहे.

धारावी पुनर्विकासासाठी जागा

धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेने ४५ एकर जागा दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. यासाठी रेल्वे व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करारही करण्यात आला. सात वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘आमचेच सरकार येणार’

रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढेही आमचेच सरकार येईल, असा दावा केला. जे गेल्या ६० वर्षांत झाले नाही ते पाच वर्षांत केले. रेल्वेचे अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले, असे मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वेमंत्रालयाकडे आणखी काही प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मंजुरीसाठी पाठवणार आहोत.

सुविधांचे उद्घाटन

  • अंबरनाथ स्थानकात नवीन पादचारी पूल, पाच सरकते जिने. बदलापूर स्थानकात दोन नवीन पूल, दोन सरकते जिने
  • मध्य रेल्वेवर आणखी एक १५ डबा लोकल, कल्याण, ठाणेसाठी धावणार
  • चार लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये उत्कृष्ट प्रकल्पांतगर्त बदल
  • अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान चिखलोली नवीन स्थानकाचे भूमिपूजन

नवे प्रकल्प

  • सोलापूर -तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग. आठ नवीन स्थानके , ९०४ कोटींचा खर्च. २०२३पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

First Published on March 4, 2019 12:59 am

Web Title: centre to extend local trains services to alibaug
Next Stories
1 मुंबईचे आणखी एक निवृत्त पोलीस आयुक्त राजकारणात!
2 राहुल यांच्या घोषणेने पारंपरिक मतपेढी काँग्रेसकडे वळणार?
3 तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातच?
Just Now!
X