राज्य सरकारच्या वाढीव धान्य खरेदीच्या मागणीवर केंद्र सरकारने तत्परतेने पावलं उचलत धान्यखरेदीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, वाढीव मका व ज्वारी खरेदीची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र, त्याचं वितरण कसं करणार याबाबत काही कळवण्यात आलं नव्हतं. याबाबत माहिती द्या तातडीने परवानगी देतो, अशी तयारी केंद्र सरकारने दाखविली होती. मात्र, तरीही हे वितरण नियोजनच राज्य सरकारकडून कळविण्यात येत नव्हतं.

याबाबत गेल्या वर्षीही केंद्राने राज्य सरकारला चार स्मरणपत्रे पाठविली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानीच सोयरसुतकंही राज्य सरकारला नव्हतं. अखेर राज्य सरकारच्या अक्षम्य दिरंगाईनंतर ४ जानेवारी २०२१ रोजी राज्य सरकारक़डून वितरण नियोजनाचे पत्र पाठविण्यात आले व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने तातडीने केंद्र सरकारने परवानगी दिली, असं उपाध्ये यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.