दहावीच्या इतिहास व भूगोल पाठय़पुस्तकातील चुकांपाठोपाठ आता इयत्ता नववीच्या ‘राज्य शिक्षण मंडळा’च्या हिंदी भाषा लेखकांनी ‘लोकभारती’ या पाठय़पुस्तकात अशुद्धलेखनाबरोबरच चुकीचा शब्दप्रयोग, वाक्यप्रयोगांच्या तब्बल १०० हून अधिक चुका केल्या आहेत.
विशेष म्हणजे हिंदीच्या पुस्तकात गेल्या वर्षीही चुका होत्या. त्यापैकी काही चुकांची या पाठय़पुस्तकात पुनरावृत्ती करण्याबरोबरच त्यात अधिकची भरही घातली आहे. स्वह (रूह), शिष्ठता (शिष्टता), खट्ठा (खट्टा), भुला (भूला), प्राणिमात्र (प्राणीमात्र), पचीसों (पच्चीसों), विरोगी (विरागी), बेलाग (बेदाग), परिषोष (परिपोष), प्रदिशा (प्रदशिक्षा) असे चुकीचे शब्दप्रयोग पुस्तकात जागोजागी दिसतात. राज्यातील तब्बल १२ लाख विद्यार्थ्यांना वर्षभर हे दोषयुक्त पुस्तकच अभ्यासावे लागणार आहे.
‘मुंबई प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार सभे’चे सदस्य आणि हिंदीचे शिक्षक राजेश कुमार पंडय़ा यांनी नुकत्याच बाजारात आलेल्या या पुस्तकातील चुका अधोरेखित केल्या आहेत. चुकांचे प्रमाण इतके आहे की, त्या दाखविण्यासाठी पंडय़ा यांनी अख्खे पुस्तक लाल शाईने रंगल्यासारखे वाटते. इतके दोषयुक्त पाठय़पुस्तक वाचून विद्यार्थ्यांचे हिंदी सुधारण्याऐवजी बिघडून जाईल, अशी प्रतिक्रिया पंडय़ा यांनी व्यक्त केली. अनुक्रमणिकेत दिलेला एक धडा तर पुस्तकात आलेलाच नाही. तर पुस्तकात असलेल्या एका धडय़ाचे नावच अनुक्रमणिकेत नाही. पुस्तकातील दोन्ही शब्दकोडी चुकली आहेत.
दरम्यान, हिंदीच्या पाठय़पुस्तकात चुका आढळून आल्या असतील तर त्यासंबंधात शुद्धीपत्रक काढून ते मंडळाच्या शिक्षण संक्रमण पत्रासोबत शाळांपर्यंत पोहोचविले जाईल, अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिली. छापून आलेल्या नव्या पुस्तकातील चुकांच्या तपासणीचे काम सुरू आहे. पुस्तकात चुका असतील तर त्या दुरूस्त केल्या जातील, असे हिंदी पाठय़पुस्तक अभ्यास मंडळाच्या प्रमुख छाया पाटील म्हणाल्या़

आतापर्यंतच्या ‘पुस्तकचुका’
* दहावी भूगोलाच्या पुस्तकातून भारताच्या नकाशातून अरुणाचल प्रदेशच गायब होता.
* दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अनेक ऐतिहासिक घटनांच्या सनावळ्या, ठिकाण आदी तपशील चुकीचे होते.
* संस्कृतच्या दहावीच्या पुस्तकात आद्य रचनाकारांच्या साहित्यावर एकही गद्य व पद्य पाठ नसल्याने वाद निर्माण झाला़
* बारावीच्या भूगोलाच्या पाठय़पुस्तकात निर्थक नकाशांची भरताड आह़े