पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करून मुंबईसाठी सीईओ नियुक्त करण्याच्या प्रकरणावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपवर आगपाखड केली. विरोधकांच्या खांद्याला खांदा भिडवत शिवसेनेने मित्रपक्ष भाजपवर टीकेचे आसूड ओढत महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. या विषयावर चर्चा सुरू असताना भाजप विरुद्ध इतर सर्व पक्षांच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडत होत्या. त्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला होता.
मुंबईसाठी विशेष समिती नेमण्याचे संकेत भाजप नेते नितीन गडकरी यांनी दिल्याचे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका सभागृहात या विषयावर चर्चा उपस्थित केली. मुंबई महापालिका असताना विशेष समितीची गरज काय, या समितीची मुख्यमंत्र्यांना गरज का भासली, त्यामागे नेमका काय हेतू आहे, असे अनेक प्रश्न  आंबेरकर यांनी उपस्थित केले.
मुंबई आणि विदर्भासह महाराष्ट्र अखंड राहायला हवा, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. मुंबई महापालिकेचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत. महापालिकेच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पेटून उठावे. या मुद्दय़ावर विलंबाने चर्चा उपस्थित करून विरोधी पक्षनेते राजकारण करीत आहेत, अशी टीका माजी महापौर सुनील प्रभू यांनी केली.
भाजपबरोबर राज्यात सत्तेत भागीदार होण्यासाठी शिवसेना लाचार झाल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी केला. मुंबई महाराष्ट्राची होती आणि यापुढेही महाराष्ट्राचीच राहणार, असे महापौर स्नेहल आंबेकर यांनी ठणकावून सांगत या विषयावर पडदा टाकला.