मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांचा ‘गतिमान’ कारभार; निर्णयाची चौकशी होण्याची चिन्हे

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कधीही न दाखविलेला गतिमान कारभाराचा नमुना निवृत्तीच्या शेवटच्या पाच दिवसांत दाखविला आहे. पाच दिवसांत तब्बल ४५० फाइली निकालात काढण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यामुळे पारदर्शक कारभाराचे गोडवे गाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धक्का बसला असून, या सर्व फाइली प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तपासणी करण्याचा न भुतो, न भविष्यती प्रकार झोपु प्राधिकरणात घडला आहे. मात्र फक्त २०० फाइलीच या अधिकाऱ्यांच्या हाती आल्या. अखेरीस पाटील यांनी निवृत्तीच्या शेवटच्या कालावधीत निकालात काढलेल्या सर्वच फाइली आता चौकशीच्या चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता आहे.

विश्वास पाटील यांची झोपु प्राधिकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आयएएस अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पुढे आपण धडाकेबाज निर्णय घेत असल्याचे दाखविणारे पाटील यांचा फाइली निकालात काढण्याचा वेग फारसा नव्हता. मात्र ३० जून रोजी निवृत्त होण्याआधीच्या केवळ पाच दिवसांत फाइली निकालात काढण्याचा त्यांनी जो सपाटा लावला तो कमालीचा धक्कादायक होता. याच काळात विकासकांच्या गाडय़ांच्या रांगा झोपु प्राधिकरणाच्या आवारात दिसू लागल्या होत्या. त्यानंतर विलेपाल्रे येथील एका वास्तुरचनाकाराच्या मार्फत या सर्व फाइली निकालात निघण्याच्या ‘विश्वासा’च्या अर्थपूर्ण ‘गतिमान’तेची चर्चाही प्राधिकरणात रंगली होती.

तब्बल साडेचारशे फाइली निकालात काढताना संबंधित विकासकांना अटीसापेक्ष इरादापत्र जारी करण्याचे आदेशही तयार करण्यात आले होते. चटईक्षेत्रफळ विक्रीच्या आठवडय़ाला चार ते पाच फाइली आणि वर्षभरात १२०० फाइली निकालात काढण्याचा साधारणत: वेग असतो. परंतु आतापर्यंतचा विक्रम मोडीत काढून पाटील यांनी केवळ पाच दिवसांत साडेचारशे फाइली हातावेगळ्या केल्याचे कळते. ३० जून या निवृत्तीच्या दिवशी ज्या फाइलींवर स्वाक्षऱ्या होऊ शकल्या नाहीत, त्या फाइली पाटील यांनी घरी नेल्या. त्यावर स्वाक्षऱ्या करून मागील तारखांची नोंद करण्याचा डाव होता. नोंदणीवहीत या फाइलींची जावक तारीख २९ जून असली, तरी त्यावर मागील म्हणजे २३ वा २४ तारीख टाकून स्वाक्षरी करण्याचा घाट घालण्यात आला होता. या सर्व फाइली स्वाक्षऱ्या करून १ जुल रोजी सकाळी आठच्या सुमारास प्राधिकरणात जमा केल्या जाणार होत्या. परंतु पाटील यांच्या निवृत्तीनंतर या पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेले म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांना याबाबतची कुणकुण ३० जूनच्या सायंकाळीच लागली आणि त्यांनी तात्काळ आपल्या विश्वासातील अधिकाऱ्यांना झोपु प्राधिकरणात पाठविल्यामुळे हा डाव यशस्वी होऊ शकला नाही. प्रभारी अधिकारी सहसा तात्काळ सूत्रे हाती घेत नाही. परंतु पाटील यांच्या गतिमानतेमुळे अवाक् झालेले म्हैसकर साडेनऊ वाजता झोपु कार्यालयात पोहोचले तेव्हाही त्यांना तब्बल २००हून अधिक फाइली आढळल्या. यापकी काही फाइलींवर स्वाक्षऱ्या झालेल्या नव्हत्या.

या गतिमानतेची कल्पना आल्यामुळे म्हैसकर यांनी खास अधिकाऱ्यांना १ जुल रोजीच झोपु कार्यालयात सकाळी सात वाजल्यापासून ठाण मांडायला सांगितले होते. याशिवाय झोपु कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या घरी बोलावून आपण सोबत जाऊन सूत्रे स्वीकारतो असे सांगितले. त्यामुळे धाबे दणाणलेल्या या अधिकाऱ्यांची पंचाईत झाली.

म्हैसकर यांनी कार्यालयात उपलब्ध असलेल्या २०० फाइलींसह स्कॅिनगसाठी गेलेल्या फाइलीही ताब्यात घेतल्या आहेत. विश्वास पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी थत्ते यांच्याकडेही म्हैसकर यांनी शनिवारी चौकशी करून गेल्या आठवडय़ाभरात निर्णय घेतलेल्या सर्व फाइली मागविल्या आहेत. अतिरिक्त कार्यभार स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याकडून पहिल्यांदाच अशी तपासणी करण्याचा प्रकार घडला आहे. चटई क्षेत्रफळाच्या विक्रीस अनुमती देण्याच्या काही फाइलींवर स्वाक्षऱ्या झालेल्या नव्हत्या. या फाइलींवर मागील तारखेच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा डाव होता, असेही या निमित्ताने उघड झाले आहे. म्हैसकर यांनी तात्काळ सूत्रे स्वीकारल्याने या बाबी उघड झाल्या. दरम्यान, या संदर्भात संपर्क साधला असता, मिलिंद म्हैसकर यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.

‘मंजुरी दर’ चौरसफुटाला १२५ रुपये

झोपु प्राधिकरण आणि म्हाडा हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचे लपून राहिलेले नाही. फाइलीवर स्वाक्षरी करण्यासाठीचा झोपु प्राधिकरणात चटईक्षेत्रफळाचा ‘दर’ सध्या प्रति चौरसफूट १२५ रुपये इतका आहे. कुठलाही मुख्य कार्यकारी अधिकारी औपचारिकरीत्या ते मान्य करीत नाही, परंतु हा दर दिल्यानंतरच फाइलीवर सही होते, हे विकासकांनाही ठाऊक आहे. प्राधिकरणात उपअभियंता, सहायक अभियंता, उपमुख्य अभियंता, मुख्य अभियंता ते विशेष कार्य अधिकारी, मुख्य अधिकारी या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळा ‘दर’ असतो!

म्हाडातही तेच

अशीच गतिमानता म्हाडातही तत्कालीन उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी संभाजी झेंडे यांनी दाखविली होती. त्यांनीही निवृत्तीच्या शेवटच्या दिवसांत अशाच पद्धतीने व्हीपी कोटय़ातील चटईक्षेत्रफळाच्या फाइली निकालात काढल्या होत्या. परंतु झेंडे यांचा कार्यभार मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याकडे असल्यामुळे त्याबाबत काहीही होऊ शकले नव्हते. अर्थात पाच दिवसांत साडेचारशे फाइली निकालात काढण्याची गतिमानता झेंडे यांनाही जमली नव्हती.

मी ४५० फाइली निकालात काढल्या असे म्हणणे ही अतिशयोक्ती आहे. इरादापत्रात सुधारणा वा तत्सम छोटय़ा-मोठय़ा कामाच्या फक्त १२० फाइली होत्या. त्या दहा दिवसांतील होत्या. आतापर्यंत कुठल्याही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या निवृत्तीच्या काळातील फाइलींची संख्या ही एवढी असतेच. मी या संदर्भात काहीही चुकीचे केलेले नाही. 

– विश्वास पाटील, निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपु प्राधिकरण