सिरॅमिक्स हे खरं तर अनेक प्रकारच्या मातीकामाचं समूह-नाव. आज आधुनिक दृश्यकलेचा भाग म्हणून सिरॅमिक-शिल्पं किंवा सिरॅमिकच्या कलावस्तूही दिसतात, तेव्हा ‘क्ले’, ‘टेराकोटा’, ‘राकू’, ‘अर्दनवेअर’, ‘पोर्सेलीन’, ‘स्टोनवेअर’ अशी निरनिराळी विशिष्ट नावं त्या-त्या साधनांना वापरलेली दिसतात आणि ती सारी नावं इंग्रजी असूनही जणू सहज अंगवळणी पडलेली असतात. मातीकामाची भारतीय परंपराही मोठी आहेच. कौलंही मातीची आणि भांडीही मातीची, तरीही प्रत्येक मातीचं वैशिष्टय़ भारतीयांनी जपलं. पण उदाहरणार्थ पोर्सेलीनसारखी साधनं आपल्याकडे गेल्या काही शतकांमध्ये पोहोचली. तीही भारतीयांनी आपलीशी केली. आधुनिक कलाशिक्षणात सिरॅमिकचाही समावेश झाल्याने गेल्या अनेक दशकांत भारतीय सिरॅमिक-कलावंतांनी जगात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कलेच्या भारतीयत्त्वाची चिकित्सा करू गेल्यास दोन मुद्दे नेहमीच लक्षात येतात : (१) पारंपरिक कलांमध्ये, कारागिरीत जरी बाह्य़ प्रभाव आले असले, तरी त्यांचं आत्मीकरण सहजपणे होत होतं.. नवी तंत्रं आत्मसात करूनही भारतीय कारागीर परंपरा समृद्ध करत होते (२) आधुनिक कलाशिक्षणानंतर, ती परिभाषा आत्मसात केलेले कलावंत मुद्दामहून ‘काय म्हणजे भारतीय’ किंवा ‘काय म्हणजे भारताच्या संदर्भात आधुनिक?’ या प्रश्नांची उत्तर शोधू लागले होते.

हे दोन्ही मुद्दे साक्षात् जिवंत झालेले पाहायचे असतील, तर दोन निरनिराळी प्रदर्शनं पाहता येतील. लोअर परळ रेल्वे स्थानकानजीकच्या गणपतराव कदम मार्गावर ‘पिरामल टॉवर’च्या तळमजल्यावरच (बी विंग) ‘पिरामल म्युझियम ऑफ आर्ट’ आहे, तिथं ‘म्यूटेबल : सिरॅमिक अ‍ॅण्ड क्ले आर्ट इन इंडिया सिन्स १९४७’ हे प्रदर्शन सुरू आहे. ते १५ जानेवारी २०१८ पर्यंत पाहता येईल. या प्रदर्शनात अनेक पारंपरिक कारागिरांनी आपल्या कामांत कलात्मकरीत्या केलेले बदल पाहता येतीलच, शिवाय काही आधुनिक सिरॅमिक-कलावंतांचं कामही पाहायला मिळेल.

दुसरं प्रदर्शन आहे जी. रेघु यांचं. जहांगीर आर्ट गॅलरीच्या मोठय़ा (सभागृह) दालनात ते भरलं आहे. रेघु हे दोन-तीन फूट उंच मनुष्याकृती सिरॅमिकमध्ये घडवण्यासाठी प्रख्यात आहेत. त्यांच्या या ‘स्टोनवेअर’ कृतींमधून भारतीय समाजजीवनाचे पैलू उलगडतात! रंगचित्रांतून, शिल्पकलेतून जे साध्य होतं, तेच सिरॅमिक्समध्ये साध्य करावं असा ध्यास फार कमी जणांनी घेतला, त्यापैकी रेघु हे महत्त्वाचेच. त्यामुळे हे प्रदर्शन चुकवू नये.

जहांगीरमध्येच..

ज्येष्ठ मुद्राचित्रणकार प्रयाग झा, शहरी जीवनाचं आणि निसर्गाचं चित्रण सारख्याच तजेल्यानं आणि प्रकाशाचा वेध घेण्याच्या ध्यासानं करणारे चित्रणकार सुरेश भोसले; तसंच गेली अनेक र्वष अजिंठा/ वेरुळची चित्रं रंगवणारे आणि पुढे पंढरपूर, जेजुरी अशाही विषयांकडे वळलेले परशुराम सुतार यांची प्रदर्शनं ‘जहांगीर’च्या एकापाठोपाठ असलेल्या प्रदर्शन-दालनांमध्ये भरली आहेत. सुतार यांच्या कामात यथादृश्य चित्रणच असलं, तरी उदाहरणार्थ वेरुळची गुंफा – तिचा अंतर्भाग, तिचं प्रवेशदार किंवा अन्य ठिकाणची वैशिष्टय़पूर्ण कोरीव नक्षी, या गुहेतली एखादी दगडी मूर्ती या सर्व दृश्यांची संगती त्यांच्या चित्रांत दिसते. आणखी नीट जर पाहिलं तर जवळपास सर्वच चित्रांमध्ये चौकोनी ठिपक्यांचा समूह कुठे ना कुठे दिसेलच.. काय आहे हे? हे भौमितिक आकार इथे कसे काय? – बुद्धकालीन गुंफांमध्ये जे ‘गवाक्ष’ असायचं, ते जाळीदार असलं तरी जाळी साधीशीच- दगडातून चौकोनी आकारात कोरलेली अशी – असायची. ते हे गवाक्ष, प्रत्येक चित्रात अगदी मूकपणे येतं आणि चित्राला नवी मिती देतं, दृश्याचा बहुस्तरीय-पणा वाढवतं! ‘जहांगीर’च्याच वरच्या मजल्यावर, ‘हिरजी जहांगीर गॅलरी’त रूमी समाधान यांची शिल्पं आणि रेखाचित्रं यांचं प्रदर्शन भरलं आहे. ‘जहांगीर’च्या सर्वच प्रदर्शनांप्रमाणे तेही १५ ऑक्टोबपर्यंतच पाहता येईल.