अवघ्या तीन महिन्यात अभ्यास पूर्ण करण्याचे आव्हान; बारावीच्या गुणांनुसार परीक्षा घेण्याची मागणी

अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबतच कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांकरिता यंदापासून ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) लागू करण्यात येणार आहे. मात्र परीक्षेला चार महिने असताना हा बदल केला गेल्याने प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे ही परीक्षा या वर्षी बारावीच्या गुणांआधारे करण्याची मागणी विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येत आहे.

अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांच्या राज्यातील महाविद्यालयांमधील प्रवेशांकरिता घेतल्या जाणाऱ्या  ‘एमएचटी-सीईटी’तूनच कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश केले जाणार आहेत. ही परीक्षा १० मे रोजी होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा असणार की नाही याची कल्पनाच नसणाऱ्या विद्यार्थ्यांनी अवघ्या चार महिन्यांमध्ये परीक्षेची तयारी कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.

कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आत्तापर्यत बारावीच्या गुणांच्या आधारे करण्यात येत होती. मात्र १५ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या  अध्यादेशानुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने आता ही प्रवेश प्रकिया राज्याच्या एमएचटी-सीईटीआधारे करण्याचा निर्णय घेतला आहे. या अध्यादेशानुसार आता कृषीअंतर्गत येणाऱ्या उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य असेल.

कृषी अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी लागू करण्याचा निर्णय ‘भारतीय कृषि अनुसंधान परिषदे’ने मागील वर्षीच घेतला होता. मात्र या राज्यात त्याची अंमलबजावणी रखडली होती. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने कोणतीही हालचाल गेल्या वर्षभरात न केल्याने आता विद्यार्थ्यांना अवघ्या तीन ते चार महिन्यात प्रवेश परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

एमएचटी-सीईटी येत्या १० मे रोजी होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १८ जानेवारी ते २५ मार्चपर्यंत आहे. अर्ज भरण्याच्या केवळ तीन दिवस आधी अशाप्रकारे अध्यादेश काढल्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. सीईटी परीक्षा असणार की नाही याबाबत गंधही नसल्याने या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची कोणतीही तयारी केलेली नाही.  विद्यार्थ्यांना  कमी कालावधीमध्ये परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. त्यांमुळे त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

खेडय़ातील विद्यार्थ्यांना हा निर्णय वेळेत समजला नाही तर अर्ज करण्याची संधी ही हुकेल. त्यात परीक्षेची तयारी करण्याकरिताही त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही. तेव्हा शेतकऱ्यांसोबत आता शेतकऱ्यांच्या मुलांनीही आत्महत्या करु नये असे सरकारला वाटत असेल तर यावर्षी बारावीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश करावे.

– विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच