राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज सकाळी भेट घेतली. तब्बल अडीच तास चाललेल्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भुजबळ यांचे आगमन झाले होते. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास ते राज ठाकरेंच्या घरून रवाना झाले.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकलेल्या भुजबळ यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट घेतली याचीच चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र आपण कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे तर राज ठाकरे यांच्या मातोश्रींना दुखापत झाल्यामुळे आपल्या पत्नीने त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून आपण कृष्णकुंजवर गेल्याचे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले आहे.  राज ठाकरे यांच्या मातोश्री आणि माझी पत्नी या चांगल्या मैत्रिणी आहेत. मी आजच अधिवेशनासाठी नागपूरला रवाना होत असल्याकारणाने पुढे अनेक दिवस या जुन्या मैत्रिणींची भेट अशक्य होती. म्हणून मी आज कृष्णकुंजवर आलो होतो, असे ते म्हणाले.