News Flash

गस्त वाढली, सोनसाखळी चोरी घटली

पोलीस, रहिवासी आणि उत्साही तरुणांच्या एकत्रित मोहिमेचा परिणाम सामाजिक बांधीलकी जपणारे पोलीस, जागरूक नागरिक आणि सळसळता

पोलीस, रहिवासी आणि उत्साही तरुणांच्या एकत्रित मोहिमेचा परिणाम
सामाजिक बांधीलकी जपणारे पोलीस, जागरूक नागरिक आणि सळसळता उत्साह असलेले तरुण यांनी एकत्र येऊन एखाद्या समस्येच्या मुळाशी जायचे ठरविले तर त्याचे काय सकारात्मक परिणाम होऊ शकतात याचा अनुभव सध्या बोरिवली-गोराईतील रहिवासी घेत आहेत. कारण, राज्यभरात इतरत्र सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले असताना येथील पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने राबविलेल्या मोहिमेमुळे सोनसाखळी चोरांना अटकाव घालण्यात लक्षणीयरीत्या यश मिळविले आहे. इतके की सोनसाखळी चोरीसाठी कुख्यात समजल्या जाणाऱ्या बोरिवली आणि एमएचबी परिसरात गेल्या तीन महिन्यांत केवळ दोनच सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. इतकेच नव्हे तर जागरूक रहिवाशांमुळे सात ते आठ सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आले आहे.
राज्यभरात नोंदणी झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये सोनसाखळी चोरीचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे ४० ते ४५ टक्के इतके लक्षणीय आहे. मुंबईतही बोरिवली आणि एमएचबी या पोलीस ठाण्याअंतर्गत येणारा परिसर सोनसाखळी चोरीत आघाडीवर होता. परंतु, गोरेगाव ते दहिसर परिसराचा सहभाग असलेल्या परिमंडळ ११तर्फे गेले चार महिने सोनसाखळी चोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याचे परिणाम आता या भागात दिसू लागले आहेत. या ठिकाणी २०१४मध्ये ४१ (एमएचबी) आणि ५१ (बोरिवली) अशा एकूण ९२ सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद झाली होती. मात्र, ही मोहीम सुरू झाल्यानंतरच्या पुढील तीन महिन्यांच्या म्हणजे जून ते सप्टेंबर काळात केवळ दोन घटनांची नोंद झाली आहे. तसेच रहिवाशांच्या जागरूकतेमुळे चोरी करणाऱ्या दोघाजणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघा चोरांनी दिलेल्या माहितीमुळे मीरारोड, कांदिवली येथील आणखी पाच ते सहा चोरांच्या मुसक्या पोलिसांना आवळता आल्या आहेत.
येथील पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी या माहितीला दुजोरा देताना पोलिसांच्या मोहिमेला रहिवासी आणि तरुणांनी दिलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. केवळ बोरिवली किंवा एमएचबीच नव्हे तर गोरेगाव ते दहिसर या संपूर्ण भागातीलही सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याचे त्यांनी सांगितले. येथील गोरेगाव, बांगुरनगर, मालवणी आदी नऊ पोलीस ठाण्यांत २०१४च्या जून ते सप्टेंबर काळात सोनसाखळी चोरीच्या तब्बल ७९ घटनांची नोंद झाली होती. परंतु, २०१५मध्ये ही संख्या अवघ्या २५वर आणण्यात यश आल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
तरुणांचीही मोलाची मदत
गोरेगाव-दहिसर (पश्चिम) भागात सोनसाखळी चोरीचे प्रमाण इतर गुन्ह्य़ांच्या तुलनेत जास्त आहे. २०१४मध्ये तब्बल १८२ सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद झाली होती. त्यामुळे, आधी आम्ही सर्वाधिक चोऱ्या कुठे आणि कोणत्या वेळेत होतात याचा अभ्यास केला. साधारणपणे सकाळी मॉर्निग वॉक करताना, दुपारी कामास्तव किंवा रात्री पाय मोकळे करण्यासाठी म्हणून बाहेर पडणाऱ्यांना याचा फटका बसत असल्याचे आम्हाला आढळून आले. त्यामुळे, आम्ही आधी ही ठिकाणे हेरून त्या भागातील गस्त वाढविली. तसेच, आपल्या अंगाखांद्यावरील दागिन्यांची काळजी अशा पद्धतीने घ्यावी, शक्यतो फुटपाथवरून चालावे अशा सूचना आम्ही गस्त घालताना देऊ लागलो. याशिवाय उत्साही आणि तरुण मोटरसायकलस्वारांची मदत आम्हाला लाभली. त्यांच्या मदतीने प्रत्यक्ष गुन्हा करताना चोरांना पकडण्यात आम्हाला यश आले. असे ३० ते ४० तरुण सध्या आम्हाला मदत करीत आहेत. त्यांची आम्हाला मोलाची मदत होते.
विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 7:19 am

Web Title: chain snatching cases decreased in borivali gorai
Next Stories
1 उन्हाचा ‘ताप’ वाढला!
2 परपुरुषाशी संबंध ठेवणारी स्त्री कायमस्वरूपी पोटगीस अपात्र
3 महापालिकेत ‘स्वच्छता अभियाना’ची ऐशीतैशी
Just Now!
X