जयेश शिरसाट, मुंबई

आठ वर्षांत मुंबईतील चोरीच्या घटना १५ टक्क्यांवर; पोलिसांच्या प्रतिबंधात्मक उपायांना यश

रस्त्यावरून, पदपथावरून चालत किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या एखाद्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी किंवा सोन्याचे दागिने खेचून पलायन करणाऱ्या सोनसाखळी चोरांवर वचक बसवण्यात मुंबई पोलीस यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सोनसाखळी चोरी मुंबईतून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. २०११ मध्ये मुंबईत घडलेल्या २०४४ सोनसाखळी चोरीच्या घटनांच्या तुलनेत चालू वर्षांत आतापर्यंत अवघ्या ३१ घटना उघड झाल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत शहरी भागांत वाढलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. या प्रकारात महिलावर्गाला लक्ष्य करण्यात येत असल्याने प्रतिकार कमी आणि चोरीची कमाई जास्त असल्याने तरुणवयात पदार्पण केलेली मुलेही या गुन्हेगारीकडे वळत होती. भरधाव वेगाने दुचाकी चालवून रस्त्याने जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा करण्याची त्यांची कार्यपद्धत. अवघ्या काही सेकंदांत ही लूट होत असल्याने पीडित व्यक्ती सावरण्याच्या आत चोर गायब होत होते. त्यातच चोरीसाठी चोरलेल्या दुचाकींचा वापर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ठिकठिकाणी जाळे नसल्याने या चोरटय़ांचा माग काढणेही कठीण बनले होते.

ही बाब लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोरांच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास केला. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात घडलेल्या प्रत्येक गुन्ह्य़ाची पद्धत, वेळ आणि अन्य महत्त्वाचे तपशील गोळा करून त्याआधारे एकत्रित अभ्यास केला गेला. सराईत गुन्हेगारांची, सातत्याने गुन्हे घडणाऱ्या ठिकाणांची यादी तयार केली गेली. त्यानुसार व्यूहरचना आखून कारवाई सुरू करण्यात आली. यात अभिलेखावरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष, गस्तीच्या वेळा, पद्धतीतील बदल, यादीतील प्रत्येक ठिकाणी २४ तास बंदोबस्त ठेवला गेला. सायन पोलिसांनी तीन सराईत चोरांना मोक्का लावून उर्वरितांना सक्त संदेश धाडला. मोक्कान्वये कारवाई झालेले तीन आरोपी वर्षभर कारागृहात बंद आहेत. त्यांना जामीन मिळू शकलेला नाही. याशिवाय गर्दुल्ल्यांना अटक करून त्याच दिवशी आरोपपत्र धाडण्यास सुरुवात केली. जोडीला सीसीटीव्हींनीही मदतीचा हात दिला.

परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले. गुन्हा घडलाच तर कमीत कमी वेळेत आरोपींना अटक करून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यावर जास्त भर दिला गेला. चोरी कशी होते, ती कशी आटोक्यात आणता येईल याबाबत वस्त्यावस्त्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. रस्त्यावरून चालताना कायम सतर्क राहा, पदपथावरून चाला, गळ्यातल्या दागिन्यांवर पदर घ्या, अशा सहज-साध्या सूचना केल्या गेल्या. या साऱ्यांचा अनुकूल परिणाम दिसून येत असून सोनसाखळी चोरीचे प्रमाण आता नगण्य असल्याचे आढळून आले आहे.

शीव, माटुंगा पोलिसांचे यश

दादर, माटुंगा, शीव, वडाळा, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल अशा परिसराची जबाबदारी असलेल्या शीव, माटुंगा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण जास्त होते. २०११ मध्ये मुंबईत अशा घटना दोन हजारांच्या आसपास असताना या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल दोनशे गुन्ह्य़ांची नोंद होती. मात्र तत्कालीन पोलीस उपायुक्तांनी सायन-माटुंगासाठी विशेष सोनसाखळी विरोधी पथकाची निर्मिती केली. पुढे गुन्हे शाखेनेही हा गुन्हा रोखण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केला. या पाश्र्वभूमीवर माटुंगा पोलिसांनी गेल्या १८ महिन्यांत सोनसाखळी चोरांना आपल्या हद्दीतून हद्दपार केले. या काळात चोरीचा एकही गुन्हा होऊ दिला नाही. तर सायन पोलिसांनी ११ महिने सोनसाखळी चोरीला थोपवून धरले. गेल्या आठवडय़ात शुक्रवारी सायन सर्कल येथे पहिली घटना घडली.

सोनसाखळी चोरीचा गुन्हा सर्वसामान्यांना थेट भोवतो. हे गुन्हे आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी ते पूर्णपणे थांबतील यासाठी धडपड सुरूच राहील. तसेच तोतया पोलिसांकडून होणारी फसवणूक, वाहनचोरी, जबरी चोरी, बालकांचे अपहरण, त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार हे गुन्हेही थोपवण्यासाठी सर्व पातळयांवर प्रयत्न सुरू आहेत.

दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त मुंबई