भारतीय संविधानाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वंदन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातून लाखो आंबेडकरभक्तांनी चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. बाबासाहेबांचे विचार पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवणाऱ्या पुस्तकांसह, त्यांची छायाचित्रे असलेली लॉकेट्स, त्यांचे आणि भगवान गौतम बुद्ध यांचे पुतळे, दलित चळवळीतील गाणी, बाबासाहेबांवर आधारित गाण्यांच्या सीडी, निळ्या झेंडय़ाखाली एकवटलेले हजारो लोक यांमुळे चैत्यभूमीवर निळे चैतन्य अवतरल्यासारखे वातावरण आहे.
दादर स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत जाणारे सवर्च रस्ते बुधवारी सकाळपासूनच गजबजलेले होते. विदर्भ, मराठवाडा तसेच थेट उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांमधूनही दादरला उतरलेले भीमपुत्र चैत्यभूमीची वाट चालत होते. काही जण मंगळवारी रात्रीपासूनच शिवाजी पार्क भोवतीच्या पदपथावर पथाऱ्या पसरून मुक्कामाला आहेत.
शिवाजी पार्कवर अनेक पक्षांतर्फे तंबू उभारण्यात आले असून तेथे बुधवारी दुपारी मोफत अन्नछत्र सुरू होते. त्याचप्रमाणे बाबासाहेब व गौतम बुद्ध यांचे पुतळे, मूर्ती, बाबासाहेबांवरील गाणी, त्यांनी लिहिलेली व इतर दलित साहित्यावरील पुस्तके, जपमाळा, मेणबत्ती स्टँड, ब्रेसलेट वगैरे विकणाऱ्या स्टॉल्सचीही गर्दी शिवाजी पार्कमध्ये झाली आहे.
चैत्यभूमीवर जमणाऱ्या जनसमुदायाचा विचार करून पालिकेने फिरती शौचालये आणि टँकरद्वारे पाण्याची सोयही केली आहे. आंघोळीच्या पाण्यासाठी पालिकेने तात्पुरती नळजोडणी केली असून प्रत्येक नळजोडणीच्या बाजूला ‘मुंबईतील पाणी टंचाईचा विचार करून पाणी जपून वापरा’, अशा सूचना लिहिलेले फलकही लावले आहेत.