संदीप आचार्य

पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईला करोनापासून वाचवायचे असेल तर टाळेबंदी अत्यंत कडक करण्याची गरज असून करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला शोधून किमान १४ दिवस त्यांचे विलगीकरण कले पाहिजे. रुग्णोपचाराचे शिवधनुष्य एकवेळ पेलता येईल, पण करोनाची साखळी तोडणे हे खरे आव्हान असल्याचे लीलावतीमधील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

करोनाची साखळी तोडण्यासाठी करोना रुग्णांबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला शोधून किमान १४ दिवस विलगीकरणात ठेवले पाहिजे. तसेच लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांनाही घरी अथवा संस्थात्मक विगगीकरणात १४ दिवस ठेवणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

केरळसारख्या राज्याने तिहेरी टाळेबंदी केली. करोना रुग्णापासून ते संपर्कातील व्यक्तीना १४ ते २८ दिवसांपर्यंत सक्तीने विलगीकरणात ठेवले. यातूनच केरळमधील करोनाची साखळी तोडण्यात यश आल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. केरळ व मुंबईत खूप मोठा फरक आहे. साठ लाखाहून अधिक लोक झोपडपट्टीत राहातात. धारावीपासून ते बोरीवलीच्या गणपत पाटीलनगपर्यंत अनेक ठिकाणी पसरलेल्या झोपडपट्टय़ा तसेच टाळेबंदीबाबत लोकांची असलेली उदासीनता यामुळेच करोनाबाधित वाढत आहेत. अशावेळी करोनाबाधितांच्या संपर्कात आलेली एकेक व्यक्ती शोधणे आवश्यक आहे अन्यथा ही साखळी तुटणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अलीकडे संपर्कातील तसेच लक्षणे नसलेल्यांना आठव्या वा दहाव्या दिवशी घरी सोडले जाते ते अत्यंत चुकीचे असल्याचे डॉ. जोशी म्हणाले.

मुंबई व ठाण्यात टाळेबंदीचे पालन जवळपास होत नसल्याचे अनेक भागात दिसून येत आहे. पोलिसांमध्येही मोठय़ा प्रमाणात करोनाची लागण दिसून आल्यामुळे पोलिसही आता कंटाळलेले दिसत आहेत. यातून जागोजागी पोलीस दिसत असले तरी त्यांची कारवाई मात्र थंडावली आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एका करोना रुग्णामागे दहा संपर्कातील लोकांना शोधून काढण्याचे आदेश जारी केले आहेत. ही मोहीम किती जोरात राबवली जाईल यावर करोनाची साखळी तुटण्याचे भवितव्य अवलंबून असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय..

राज्याची आर्थिक परिस्थिती हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे. तथापि टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले तर टाळेबंदी कडक करण्याची नितांत गरज असल्याचे मुंबईसाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले. मला मान्य आहे की लोक आता टाळेबंदीला कंटाळले आहेत पण करोनाची साखळी तोडण्यासाठी परिणामकारक टाळेबंदी लागू केली पाहिजे तसेच करोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे काटेकोर विलगीकरण हाच पर्याय असल्याचे डॉ. ओक म्हणाले. रुग्ण वाढत असल्याने त्यांचे योग्य वर्गीकरण करून त्यानुसार उपचाराची व्यवस्था करणे तसेच करोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधून साखळी तोडणे तसेच रुग्णांसाठी पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे केईएमचे माजी अधिष्ठाता व मुंबईतील करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.