पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे देशातील वीजमागणी खाली जाऊन ९ मिनिटांनी ती पुन्हा उसळून वर येणार असल्याने या झटक्यातून विजेचे राष्ट्रीय ग्रिड सुरक्षित ठेवण्याचे आव्हान वीज क्षेत्रातील तंत्रज्ञांसमोर उभे ठाकले आहे.

विजेच्या क्षेत्रात मागणी व पुरवठय़ाचे संतुलन अत्यंत आवश्यक असते. मागणी व पुरवठा समसमान असल्यास ग्रिडची फ्रीक्वेन्सी ५० हर्ट्झ राहते. भारतातील विजेच्या ग्रिडसाठी ते आदर्श संतुलन मानले जाते. मात्र, सर्वसाधारणपणे ४९.५ ते ५०.५ हर्ट्झ ही भारतातील विजेच्या ग्रिडसाठी सुरक्षित फ्रीक्वेन्सी मानली जाते. मात्र, अचानक वीजमागणी कमी झाल्यास किं वा वाढल्यास फ्रीक्वेन्सी सुरक्षित प्रमाणापेक्षा कमी किं वा जास्त होते व ग्रिड कोसळून वीजनिर्मिती केंद्रे बंद पडणे- भारनियमन होणे, असे प्रकार होतात.

पंतप्रधानांच्या आवाहनामुळे देशातील वीजमागणी अकस्मात १५ ते २० हजार मेगावॉटने कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर नऊ मिनिटांनी पुन्हा ती वीजमागणी झपकन उसळी मारून सरासरीइतकी होईल. या तांत्रिक झटक्यामुळे विजेच्या ग्रिडची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वीजमागणी-पुरवठय़ाचे संतुलन साधून ग्रिडची सुरक्षा कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे. औष्णिक वीजप्रकल्प अचानक बंद किं वा सुरू करता येत नाहीत. ती क्षमता जलविद्युत प्रकल्पांमध्ये असते.

चटकन घसरलेल्या विजेची मागणी अचानक पुन्हा वाढल्यानंतर ग्रिड सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. विजेच्या मागणी-पुरवठय़ाचे संतुलन राखताना अशा वेळी थोडी जरी चूक झाली तर ग्रिड कोसळण्याचा धोका असतो. मात्र, राष्ट्रीय पातळीवर काटेकोर नियोजन व अचूक अंमलबजावणी करून या आव्हानावर मात करता येईल. त्यासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील यंत्रणेला डोळ्यांत तेल घालून काम करावे लागेल.

– अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ

वीजमागणीत अचानक घसरण किं वा वाढ झाल्यास त्याचे व्यवस्थापन करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यावर मात करण्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक ठरते. राष्ट्रीय भार प्रेषण केंद्रातील तज्ज्ञ मंडळी त्या पद्धतीने काम करून या प्रसंगी ग्रिड सुरक्षित ठेवू शकतील.

– व्ही. पी. राजा, माजी अध्यक्ष, राज्य वीज नियामक आयोग

विजेच्या मागणीमध्ये अचानक वाढ किंवा कमी होण्याने यंत्रणेतील ग्रिडवरील ताण वाढतो हे खरे आहे. मात्र, सध्याची स्थिती अभूतपूर्व आहे. नक्की किती मागणी कमी होईल किंवा परत किती मागणी वाढेल, याचा अंदाज नाही. मागणी आणि निर्मिती यातील समतोल राखणे शक्य आहे; पण वीज वितरण यंत्रणेवर काय परिणाम होतील, हे सांगणे अवघड आहे.

– शंतनू दीक्षित, प्रयास ऊर्जा गट अध्यक्ष