01 October 2020

News Flash

करोनाबरोबर साथीच्या आजारांचेही आव्हान!

रुग्णालय, बेड, डॉक्टरांची कमतरता

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य
मुंबईत: पावसाळ्याला आता महिनाभराचा अवकाश राहिलेला असताना आता अपुऱ्या मनुष्यबळानीशी करोनाबरोबर पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा सामना कसा करायचा हा लाखमोलाचा प्रश्न मुंबई महापालिकेला सोडवावा लागणार आहे.करोनाचे रुग्ण मे अखेरीस व जूनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दहा दिवसांमागे दुप्पट अशा वेगाने करोनाचे रुग्ण वाढत असून मुंबईत आज १५ हजार असलेली रुग्ण संख्या मे अखेरीस ३५ ते ४० हजारच्या घरात जाईल.

तर जून महिन्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढेल असे पालिकेच्या उच्चपदस्थामचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आरोग्य विभागाची सर्व फौज करोनाच्या लढाईत गुंतवून ठेवली असून पावसाळ्यात उद््भवणार्या मलेरिया, डेंग्यू व लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा सामना कसा करणार हा एक प्रश्नच असल्याचे पालिकेतील ज्येष्ठ डॉक्टर सांगतात.

साधारणपणे पावसाळापूर्व म्हणजे ३० मे पूर्वी मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यांमधून साडेपाच लाख टन गाळ काढते. तसेच झोपडपट्टी व गरीब वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात आरोग्य सर्वेक्षणाचे काम केले जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी पावसाळापूर्व सात हजारांहून अधिक शासकीय इमारती व ३० हजाराच्या आसपास पाण्याच्या टाक्यांची तपासणी केली जाते. याशिवाय गरीब वस्त्यांमध्येही मलेरिया, डेंग्यू व लेप्टोस्पायरोसिस बाबत जनजागृती केली जाते. मात्र यंदा आमचा सर्व कर्मचारीवर्ग हा करोनाच्या कामात गुंतल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले.
“एकीकडे पालिकेच्या शीव, नायर, केईएमध्ये करोनासाठी बेड वाढविण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे कमी लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तसेच संस्थात्मक क्वारंटाईनसाठी एमएमआरडीए, एनएससी,वरळी, रेसकोर्स आदी ठिकाणी खाटा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. आतापर्यंत जवळपास ३४ हजार खाटांची व्यवस्था संस्थात्मक क्वारंटाइनसाठी करण्यात आली असून आगामी काही दिवसात ७५ हजार खाटा तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे” असेअतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मात्र या ठिकाणी डॉक्टर व अन्य आरोग्य सेवकांची व्यवस्था कशी करणार या प्रश्नाचे ठोस उत्तर आजतरी कोणाकडे नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून खाजगी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टरांच्या माध्यमातून काही प्रमाणात डॉक्टर उपलब्ध होतील असा विश्वास आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केला. मात्र करोनाबरोबर येणाऱ्या साथीच्या आजारांचा सामना कसा करणार तसेच सर्वेक्षण व जनजागृती करण्याचे मोठे आव्हान आज पालिकेसमोर आहे.

मुंबईसाठी नेमलेल्या विशेष कृती दलानेही पावसाळ्यात साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी पुरेशी तयारी करण्याची सूचना केल्याचे या कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले. मुंबईत झोपडपट्ट्या, सखल भाग, पूरस्थिती उद्भवणाऱ्या जागा या सर्वांचा विचार करावा लागणार असल्याचे डॉ. संजय ओक म्हणाले. “साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी आता आरोग्य विभागातील काही पथक वेगळी करून त्यांच्यावर केवळ साथीच्या आजरांचीच जबाबदारी द्यावी लागणार असून उपनगरीय रुग्णालयावर यासाठी विशेष जबाबदारी देता येईल. खासगी डॉक्टरांनीही आता पालिकेच्या मदतीसाठी मैदानात उतरणे गरजेचे आहे” असे डॉ. संजय ओक म्हणाले.

“कागदोपत्री पालिकेतील उच्चपदस्थांनी साथीच्या आजाराचा सामना करण्याची तयारी सुरु केली असली तरी पालिकेच्या केईएम, शीव व नायर या प्रमुख रुग्णालयातील चित्र वेगळेच दाखवते. आज या तिन्ही रुग्णालयात करोनाव्यतिरिक्त सामान्य रुग्णांवरील उपचार जवळपास ठप्प आहेत. अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता शस्त्रक्रिया होत नाहीत” असं केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

केईएमध्ये एकूण १८५० खाटा असून यातील करोनाच्या रुग्णांसाठी ४५० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. आजच्या दिवशी केईएमध्ये बाळंतपण व काही गंभीर आजाराचे मिळून ८१५ रुग्ण दाखल आहेत तर करोनाच्या ३०४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. एरवी केईएमध्ये दररोज सहा ते आठ हजार रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार केले जातात तर सुमारे २५० शस्त्रक्रिया होतात. आज बाह्यरुग्ण विभागात आठशे ते हजाप रुग्ण तपासले जात असून ३० ते ३५ शस्त्रक्रिया दिवसभरात होतात, असे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. या परिस्थितीत पावसाळ्यातील साथीच्या आजाराचा सामना करणे हे एक आव्हान असले तरी केईएमधील चार इमारतींपैकी एका इमारतीत या रुग्णांची व्यवस्था करता येईल, असे डॉ. देशमुख म्हणाले.

“नायर रुग्णालयात एकूण १२०० खाटा असून करोनासाठी यातील १००० खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. सध्या ६५० खाटा करोनाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आल्या असून नायर रुग्णालय हे करोना रुग्णालय बनविण्यात येणार आहे” असे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. “मात्र गंभीर रुग्ण व बाळंतपणासाठी दाखल होणाऱ्यांवर उपचार सुरू असून करोनाव्यतिरिक्त ५५० गंभीर रुग्ण आमच्याकडे सध्या उपचार घेत असून बाळंतपणासाठी ८० महिला दाखल आहेत” असेही डॉ. मोहन जोशी म्हणाले.

आज पालिकेच्या तिन्ही रुग्णालयात ५० टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. रुग्णालयीन व आरोग्य सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरहजर असल्याने करोना रुग्णांचीच कामे कशी करायची हा प्रश्न असताना साथीच्या आजारांच्या सर्वेक्षणासाठी  कर्मचारी कुठून देणार हा कळीचा मुद्दा असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. “पालिकेच्या शीव रुग्णालयात १४५६ खाटा असून आजघडीला करोना रुग्णांसाठी ३५० खाटा राखीव असल्याचे” रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. “चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न शीव रुग्णालयालाही भेडसावत असून साथीच्या आजारासाठी सायन धारावीमधील छोट्या शीव रुग्णालयात १२० खाटांची व्यवस्था करता येईल”, असे डॉ. रमेश भारमल म्हणाले. तथापि करोनाबरोबर साथीचे आजार हे पालिकेसाठी मोठे आव्हान असणार आहे, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 1:10 pm

Web Title: challenges of dengue malaria and other epidemics in mumbai scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus :रुग्णसंख्या वाढली तरी मृत्यूदर नियंत्रित!
2 मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा वाटेतच मृत्यू
3 Coronavirus : मध्य मुंबईचे संकट गडद
Just Now!
X