‘कागदावरचे दर’ २४ तासांत घसरले!

आता शिधावाटप दुकानांमधून ७० रुपये किलो दराने चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या २४ तासात चणा डाळीचे दर कागदोपत्री ७८ रुपयांवरून ७० रुपये करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ही स्वस्तातली डाळ ग्राहकांना कधीपासून मिळणार, याबाबत मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आदेशात  स्पष्ट करण्यात आले नाही. परंतु दिवाळीपूर्वी डाळ उपलब्ध करून दिली जाईल, असा दावा या खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी केला आहे.

सरकारने दिवाळीच्या तोंडावर गेल्या आठवडय़ाभरात तीन निर्णय घेतले. खुल्या बाजारातील विविध प्रकारचे गहू, तांदूळ, रवा, मैदा, खाद्य तेल, चणापीठ, शेंगदाणे आणि भाजीपालाही शिधावाटप दुकानांमधून विक्री करण्यास परवनगी दिली. अर्थात या वस्तू स्वस्त धान्य दुकानांमधून विकल्या जाणार असल्या तरी, त्याचे दर खुल्या बाजारातीलच राहणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

दिवाळीच्या तोंडावरच चणा डाळीचे भाव कडाडले. खुल्या बाजारात प्रति किलोचे दर १५० रुपयांवर गेले. त्यामुळे राज्य सरकारने २४ ऑक्टोबरला खुल्या बाजारातील डाळीचे दर ७८ रुपये करण्याचा निर्णय घेतला. अन्न व नागरी पुरवठा विभागाने तसा आदेश जारी केला. अर्थात ही डाळ फक्त मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती औरंगाबाद या शहरांमध्येच उपलब्ध करून दिली जाईल, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे इतर शहरांमधील नागरिकांनी महागाईचीच डाळ खरेदी करायची का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात २४ तासात बदल करून मंगळवारी दरकपाचीचा दुसरा आदेश काढला. आता चणा डाळ ७० रुपये प्रति किलो दराने विकण्याचा निर्णय घेतला. ही स्वस्तातील डाळ शिधावाटप दुकनांमधूनही विकली जाईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र चणा डाळ प्रत्यक्ष कधीपासून मिळणार, याबाबत ताज्या आदेशातही काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.