दिवाळीत २० रुपये दराने एक किलो साखरही

राज्यात नोव्हेंबर २०१८ पासून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील एकूण एक कोटी ४८ लाख शिधापत्रिकाधारकांना चणा व उडीदडाळ देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. त्याचबरोबर प्राधान्य गटातील एक कोटी २३ लाख कुटुंबांना २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिवाळीसाठी देण्यात येणार आहे.

दिवाळीसाठी राज्यात एक लाख २२ हजार ९४७ क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर अंत्योदय योजनेतील २५ लाख तर प्राधान्य गटातील एक कोटी २३ लाख शिधापत्रिकाधारकांना एकूण दोन किलो डाळ देण्यात येणार आहे. चणाडाळ व उडीदडाळ प्रत्येकी एक किलो किंवा दोन्हीपैकी एक डाळ दोन किलो अशा पद्धतीने डाळीचे वितरण होईल.

गुटखा बाळगल्यास अजामीनपात्र गुन्हा

गुटख्याच्या विक्रीबरोबरच वैयक्तिक पातळीवर गुटखा बाळगणेही गुन्हा आहे. तो अजामीनपात्र गुन्हा असून तशी कारवाई करावी, असा आदेश राज्यभरातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही बापट यांनी दिली. त्याचबरोबर भेसळ करणाऱ्यांविरोधात सध्या केवळ सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. ती वाढवून गुन्ह्य़ाच्या स्वरूपानुसार तीन, पाच, १० आणि जन्मठेपेपर्यंत असावी याबाबत सरकार विचार करत असल्याचेही बापट यांनी सांगितले.

२१ हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठय़ा प्रमाणावर भेसळ होत असल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ठिकठिकाणी छापे मारून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत ३५ लाख रुपये किमतीचा २१ हजार २२५ किलो भेसळयुक्त खवा, दीड कोटींचे एक लाख ५५ हजार किलो वनस्पती तूप-खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.