मुंबई : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला, तरी जाता जाता तो रेंगाळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात भारताच्या दक्षिणेकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, मुंबईसह कोकणात शनिवार-रविवारी काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

शुक्रवारी सकाळपासून हवेत थोडासा गारवा असल्याने गेल्या दोन दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला. दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारनंतर शहर आणि उपनगरातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात भारताच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या प्रभावामुळे किनारपट्टीवरील तेलंगणा, लक्षद्वीप येथे जोरदार पाऊस पडणार आहे. या स्थितीचा प्रभाव मुंबईसह कोकणावरही पडणार आहे.

किनारपट्टी क्षेत्रात जोरदार वारा वाहणार

रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि नगरमध्ये १९ ऑक्टोबरला पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यंमध्ये १९ आणि २० ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाडय़ातील औरंगाबादमध्येही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.