मुंबई/पुणे शहर आणि परिसरात गडगडाटी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर २ जुलैपासून मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्य़ात गडगडाटी वादळी पावसाबरोबरच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्य़ांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो.

दरम्यान रविवारी मध्यरात्री मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. काही ठिकाणी ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. रात्री उशिरा मध्य मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार  तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. भायखळा, परळ, प्रभादेवी, कॉटन ग्रीन, अ‍ॅन्टॉप हिल आणि नवी मुंबईच्या काही भागात परिसरात ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. तर लोअर परळ, प्रभादेवी, दादर, माटुंगा, माहिम,  या ठिकाणी २० ते ४० मिमी पाऊस झाला.

जूनचा पाऊस सरासरीपुढे

हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील पाऊस सरासरीच्या जवळपास पोहोचला असून, प्रामुख्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टय़ांमधील जिल्ह्य़ांत पावसाने दिलासा दिला आहे. पावसाचे प्रमाण कमी आणि दुष्काळी पट्टे असलेल्या नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, सांगली, लातूर, जालना, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्य़ात यंदा जून महिन्यातील पावसाने सरासरी ओलांडली आहे.

सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामध्ये जून महिन्यात राज्यात सर्वाधिक १०३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीतही (८४९ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली असली, तरी २९ जूनपर्यंत कोकण विभागातील इतर जिल्ह्य़ात मात्र पावसाची सरासरी पूर्ण झाली नव्हती. पालघरमध्ये सर्वात कमी २५६ मि.मी. (सरासरी ३८५ मि.मी.) पाऊस झाला. ठाणे जिल्हा ३७१ मि.मी. (सरासरी ४३३ मि.मी.), तर मुंबई उपनगरांमध्ये ३८३ (सरासरी ४७५) पावसाची नोंद  झाली.