पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच गुरुवारी किनारपट्टीवर मुसळधार तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी तयारीत राहण्याचा इशारा (ऑरेंज अर्लट) दिला आहे.

राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असल्याने दोन दिवसांत किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.  बुधवारी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसेच पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाउस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यंतील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गुरुवारनंतर पावसाची तीव्रता कमी होत जाईल.

पावसामुळे मुंबईत पाणी साचण्याच्या घटनांचे पूर्वानुमान देणाऱ्या ‘आयफ्लोज मुंबई’ नव्या प्रणालीनुसार भायखळा, आग्रीपाडा, दक्षिण मुंबई, देवनार, अंधेरी (प.), विलेपार्ले (प.) या प्रभागातील सखल भागात काही ठिकाणी दोन फूट पाणी साचू शकते. तर चेंबूर, वरळी, लोअर परळ, भांडूप (प.) आणि दहिसर प्रभागातील काही ठिकाणी एक फूट पाणी साचण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि परिसरात मंगळवारी अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. सीबीडी बेलापूर येथे १०५ मिमी, कांदिवली, मालवणी आणि वाशी गाव येथे ४० ते ५० मिमी पाऊस नोंदविण्यात आला. दक्षिण मुंबईत केवळ एक ते पाच मिमी पावसाची नोंद झाली, तर पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरे आणि ठाणे येथे काही ठिकाणी १५ ते ३० मिमी पाऊस पडला.

एक जण बुडाला

भांडूप (पूर्व) येथील सर्व्हिस रोड येथील कुंडेश्वर तलावात एक व्यक्ती बुडाली असून,अग्निशमन दलाचे जवान तलावात पडलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते. मात्र पाऊस आणि अंधाराचा अडथळा शोधमोहिमेत येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान मंगळवारच्या पावसाने सखल भागात पाणी साचले होते.