News Flash

चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांची ईडीकडून चौकशी

शुक्रवारी ईडीने चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या घरावर छापे टाकले होते

बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या माजी प्रमुख चंदा कोचर, व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येणार आहे. चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. चंदा कोचर आणि त्यांचे पती दिपक कोचर ईडी कार्यालायत हजर झाले आहेत. याआधी शुक्रवारी ईडीने चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या घरावर छापे टाकले होते.

सीबीआयकडून लूकआऊट नोटीस जारी करत चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती आम्हाला दिली जावी असं सांगितलं आहे.

पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती, त्यांच्या सहकारी व्हिडीओकॉन कंपनीचे दोन युनीट आणि कोचर यांच्या न्यूपॉवर रेनेवेबल्स तसेच सुप्रीम ऊनर्जी या कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे.

२००९ मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेचा व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम डावलून तसेच पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला ३०० कोटींचे कर्ज दिले होते. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात ६४ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. त्यानंतर २००९ ते २०११ या काळात चंदा कोचर यांनी वेगवेगळी कारणे दाखवत १५७५ कोटी रु.चे कर्ज दिले होते. कर्ज घेताच व्हिडीओकॉन उद्योग समुहाने ३० जून २०१७ ला कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केले. सीबीआयने याप्रकरणी चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

२२ जानेवारीला एफआयआर दाखल केल्यानंतर दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात नव्याने लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली. याआधी सीबीआयने गतवर्षी मार्च-एप्रिलमध्ये प्राथमिक तपासाचा भाग म्हणून दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्याचवेळी चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र सीबीआय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 12:44 pm

Web Title: chanda kochhar and deepak kochhar questioning by ed
Next Stories
1 पश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, दहशतवादी हल्ल्याची भीती
2 झोपडीधारकांना पुनर्विकासात ५०० चौरस फुटांची घरे!
3 अस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचे नियोजन कसे?
Just Now!
X