बावनकुळे सरचिटणीस; खडसे, तावडे, मुंडे फक्त निमंत्रितच

मुंबई : भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना प्रस्थापित नेत्यांना डालवून महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे हे जुनेजाणते नेते प्रदेशमध्ये फक्त निमंत्रित राहिले आहेत. पंकजा मुंडे यांना पक्षाच्या केंद्रीय पातळीवर संधी दिली जाईल, असे सांगण्यात आले असले तरी बहिणीची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना संघटनेत स्थान मिळणे कठीण मानले जाते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा समावेश विशेष निमंत्रित सदस्यांच्या यादीत आहे. त्यांची सून खासदार रक्षा खडसे यांना प्रदेश मंत्री म्हणून नियुक्ती दिली आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीत डावलल्या गेलेल्या पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी मिळू शकते आणि प्रदेश सुकाणू समितीतही त्या असू शकतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आपल्याबद्दल भूमिका स्पष्ट केल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्षांचे आभार मानले आहेत.

यांना संधी..

’ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.

’ याशिवाय सुजितसिंह ठाकूर, रवींद्र चव्हाण, देवयानी फरांदे, श्रीकांत भारतीय या पाच जणांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

’ पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांना बढती मिळाली. पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडल्यानेच उपाध्ये यांना संधी देण्यात आली आहे.

’ माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल आणि संजय कुटे, सुरेश हळवणकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, जयप्रकाश ठाकूर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

’ विश्वास पाठक मीडिया प्रमुख म्हणून काम पाहतील. विजय पुराणिक हे संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी पुढेही सांभाळतील. मिहिर कोटेचा यांना खजिनदारपद देण्यात आले आहे.