धारावीतील करोना प्रसार रोखण्यात यश आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलं. त्यानंतर धारावीतील करोना प्रसार रोखण्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. महापालिका प्रशासन, राज्य सरकार आणि आरएसएस यांच्यात श्रेयवादावरून कलगितुरा जुंपल्याचं बघायला मिळत आहे. या श्रेयवादावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य असून, “सगळं श्रेय सरकारं घेण्याचं कारण नाही. स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून स्क्रिनिंग केलं,” असं त्यांनी म्हटलं आहे.

धारावीतील करोना नियंत्रणासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ‘झी २४ तास’ बोलताना सांगितले की, “ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याच कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी करोनाचा केंद्र बिंदू ठरली. पण धारावीनं करोनावर मात केली आहे. पण यांचं श्रेय सरकारचं नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे. करोना विरुद्धच्या लढाईत सरकारनं केवळ भ्रष्टाचार केला,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

“केंद्र सरकारनं १४ वित्त आयोगाचे ग्रामपंचायतींना दिलेला निधी राज्य सरकार कसे वापरू शकते? हे पैसे राज्य सरकारनं घेता कामा नये, ते परत ग्रामपंचायतींना मिळाले पाहिजे. वित्त आयोगानं मांडलेल्या प्रस्तावावर हसन मुश्रीफ यांनी सत्कार करून घेतला. यात मुश्रीफ यांचं काहीही काम नाही, त्यांनी श्रेय घेऊ नये. केवळ कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सगळ्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

धारावीतील करोना प्रसार रोखण्यात यश आलं आहे. धारावी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांची दखल जागतिक संघटनेनंही घेतली आहे. त्यानंतर याबद्दल मुंबई महापालिका व राज्य सरकारचं कौतुक होत असतानाच आरएसएस स्वयंसेवकांनी केलेल्या धारावीतील करोना प्रसार नियंत्रणात आल्याचा दावा करण्यात आला होता.