शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासह विविध मुद्यांवरून भाजपावर टीका केली. यानंतर आता भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं जात आहे. शिवाय, हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुखांवर निशाणा साधला जात आहे. ”बाळासाहेबांच्या नावाने अजुन किती दिवस पोळ्या भाजणार?, खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

”राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य व भाषणातुन सादर केली. खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग?” असं ट्विट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

या ट्विट सोबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र देखील लिहिलं आहे ज्यामध्ये ते म्हणतात, ”काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती काल आली. तुम्ही काल भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षाने जाणवतंय. बाळासाहेबांच्या नावाने अजुन किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणं तुम्ही विसरला आहात.”

तसेच, ”ज्यांच्या स्मारकासाठी तुमचा कालचा कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्व देखील तुमच्या पचनी पडले नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गावर आम्ही चालत आहोत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केलं, ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है,’ हे मुळात तुमच्यासाठी होतं. हिंदुत्वाचा वापर करून आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाटी तुमचा सगळा आटापिटा सुरू आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमचं हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलत असतं.” अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

याचबरोबर ”मी कुटुंब प्रमुख आहे, असं काल तुम्ही म्हणालात. याशिवाय काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी दौऱ्यावेळी हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, असं वक्तव्य तुम्ही केलं होतं. मग जे कुटुंब बळीराजाच्या जीवावर चालतं त्यांच्यावर एकही शब्द न बोलता काल जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा उल्लेख करणं टाळलं. राज्यातील करोनाच्या परिस्थितीवर देखील चिडीचूप बसलात. केवळ आपलेच ढोल बडविण्यात तुम्ही समाधान मानलं. एकंदरीत कालच मुख्यमंत्र्यांचं भाषण हे अभ्यासशून्य व सूड भावनेने प्रेरित होते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, ११ कोटींचं कुटुंब तुम्हाला सांभाळायचं आहे. केवळ भाषणबाजी करून काहीही होणार नाही.” असं देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे.