“कंगनाने जे काय विधान केलं, ते विधान बरोबर की चुकीचं याच्या विस्तारात आम्ही जात नाही आणि तिच्या विधानाशी सहमत देखील नाही. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने महिलेला सन्मान देणं शिकवलं, महिलेचं संरक्षण करणं शिकवलं आहे. मात्र, हे लांडग्यासारखे मागे लागले आहेत, कंगनाच्या.” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंगना रणौत प्रकरणावर बोलताना महाविकासआघाडी सरकारवर आज पत्रकारपरिषदेत केली.

यावेळी चंद्रकात पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवतात वंशज म्हणवता, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण दिली का? ती काय म्हणाली तर न्यायालयात जा. न्यायालय काय तो निर्णय देईल. पोलिसात तक्रार करा. तुमचंच सरकार आहे ना? मात्र, खोट्या तक्रारी काय दाखल करताय, लोकांना उचलुन काय नेताय. तिच्याविरोधात तक्रार करा. पण भाषा काय..मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही. त्यावर तिनं असं म्हटलं की, मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही म्हणजे मुंबई काय पीओके आहे का? आता तिचं हे वाक्य बरोबर आहे की चुकीचं यात मी जातचं नाही. परंतु ती का म्हणाली? आणि तुम्ही म्हणताय की पाऊल ठेवू देणार नाही. का? ती भारतीय आहे. संपूर्ण देशात कुठंही जाण्याचा अधिकार आहे. मुंबईत येण्याचा अधिकार आहे. पण तरीही ती चुकीची असेल, तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होऊ शकते. ही दादागिरी चालणार नाही.”

महाराष्ट्रात नेहीमीच महिलेचं संरक्षण केलं गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं, शाहु महाराजांनी आम्हाला शिकवलं, महात्मा जोतिबा फुले-सावित्राबाई फुले यांनी शिकवलं, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली. त्या घटनेमध्ये कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे. चुकीचं असेल तर न्यायालयात जाऊन खटला दाखल करा. कोणालाही कुठं जाण्याचा अधिकार आहे, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.