काही वेळापूर्वीच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, काहीवेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच मंगल प्रभातलोढा यांना मुंबई भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने,  प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेरीस पक्षाकडून राज्यातील भाजपाचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांची या पदासाठी निवड करण्यात आली. तर याच बरोबर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या जागेवर आता  मंगल प्रभात लोढा यांची निवड केल्या गेली आहे.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपदावर दानवेंना कायम ठेवले जाईल अस वाटत होत. मात्र आज दानवेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाकडून तातडीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दानवे एकीकडे आपल्या राजीनाम्याची पत्रकारांसमोर घोषणा करत असताना, त्याचवेळी दुसरीकडे भाजपाच्या मुख्यालयात नव्या प्रदेशाध्यक्षांसह मुंबई भाजपा अध्यक्षांच नाव निश्चितही करण्यात आल होतं. त्यामुळे ही नाव अगोदरच ठरलेली होती यात कोणतीही शंका नाही. एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार हा निर्णय घेण्यात आला होता असे सांगण्यात आले आहे. या अगोदर दानवेंच्या रूपाने मराठवाड्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. आता पश्चिम महाराष्ट्राला ही संधी मिळाली आहे.  विशेष म्हणजे आता भाजपासह राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष हे पश्चिम महाराष्ट्रातीलच असून तिघेही मराठा समाजाचे आहेत. तर मुंबई भाजपा अध्यक्षपदी निवड झालेले मंगल प्रभात लोढा हे एक मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. शिवाय उद्योग क्षेत्रात त्यांचं मोठ नाव आहे. अनेक वर्षांपासून ते भाजपात सक्रीय आहेत. तर चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांच्या जवळचे म्हणुनही ओळखले जातात.