उमाकांत देशपांडे

अमित शहा यांचा कित्ता राज्यातही;  चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन्ही पदे

भाजप नेते आणि महसूल, सार्वजनिक बांधकाम यासारख्या मंत्रीपदांची जबाबदारी असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी मंत्रीपदही तूर्तास कायम राहणार आहे. निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्यावर पाटील यांना पक्षकार्यासाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. मात्र अमित शहा यांच्याकडे ज्याप्रमाणे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे तूर्तास तरी राज्यात ‘अमित शहा पॅटर्न‘ सुरु ठेवला जाईल. प्रदेशाध्यक्ष व मंत्रीपद या दोन्ही जबाबदाऱ्यांना मी न्याय देईन, असे चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता‘ ला सांगितले.

संघाशी घनिष्ट संबंध असलेले चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांचे विश्वासू आहेत. रावसाहेब दानवे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे सोपविली जाणार, याविषयी गेले अनेक दिवस चर्चा सुरु होती. पाटील यांच्याकडे ती दिली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु झाल्यावर त्यांनी त्याचा ठाम इन्कार केला होता व प्रदेशाध्यक्षपदासाठी ते फारसे उत्सुक नव्हते. मंत्रिमंडळातील कोणीही ज्येष्ठ मंत्री आपले पद सोडून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नव्हते. आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होत असून या कालावधीत ज्येष्ठ नेत्याकडेच पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष पद असावे, असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. पण पाटील यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्वाची खाती असून त्यांना मंत्रिपदावरुन दूर केल्यास त्याच्या उलटसुलट चर्चा सुरु होतील आणि पाटील हेही निवडणुकीच्या तोंडावर नाराज होतील, असेही बोलले जाऊ लागले.

प्रदेशाध्यक्षपद ही पूर्णवेळ जबाबदारी असून निवडणुकीनंतरही सत्ता आल्यावर पुन्हा पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा लागेल. त्यामुळे तूर्तास तरी पाटील यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केलेली नाही. अमित शहा यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाबरोबरच पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने त्या धर्तीवर सध्या कामकाज चालवावे, असा भाजपचा कल आहे. मात्र केंद्रीय पातळीवर जे.पी. नड्डा यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून नियमित कामकाज ते हाताळत आहेत. निवडणूक आचारसंहिता सुरु झाल्यावर मंत्रिपदाचे कामकाज नसते. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या कायम ठेवल्या तरी ‘एक व्यक्ती, एक पद‘ हा भाजपमध्ये नियम आहे. अमित शहा यांच्यासाठी अपवाद केला असला तरी प्रत्येक राज्यात अशी मुभा देण्याची मागणी होईल. त्यामुळे पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठींना पुढील काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यावर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे पक्षश्रेष्ठींच्या निकट राहिल्याने ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याऐवजी त्यांची नियुक्ती मुख्यमंत्रीपदी झाली होती. आता २०१९ मध्ये पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे.

दोन्ही जबाबदाऱ्यांना न्याय देईन- पाटील

प्रदेशाध्यक्षपद व मंत्रीपद या दोन्ही जबाबदाऱ्यांना मी न्याय देईन, असे पाटील यांनी सांगितले. पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाच्या दिलेल्या जबाबदारीने मी आनंदी आहे. आपल्याला जी जबाबदारी मिळाली, ती कष्टाने व प्रामाणिकपणाने पार पाडावी, अशी मला गुरुंची शिकवण आहे. त्यानुसार मी काम करीत राहणार आहे. जेव्हा पक्षाकडून आदेश येईल, त्यानुसार पुढील निर्णय होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील महिन्यात राज्यभरात विकास यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष या नात्याने सामील होणार का किंवा ही यात्रा पक्षाकडून काढली जाईल का, असे विचारता ही यात्रा मुख्यमंत्री काढणार आहेत. त्यात सर्व मंत्र्यांप्रमाणे काही अंतर मीही सहभागी होणार आहे. त्याखेरीज पक्षाच्या पातळीवरुनही त्यात माझा समावेश राहीलच. राज्य सरकारने जनतेची केलेली कामे, जनहिताचे घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोचविण्याचे काम सरकार व पक्षपातळीवरुन समन्वय राखून मी करणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.