मराठा आरक्षणाच्या विधेयकासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन पाटील यांनी त्यांची भेट घेतली. मराठा विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणासंदर्भतले विधेयक मांडण्यावर सरकार ठाम आहे. त्याच अनुषंगाने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा केली. गेल्या पंधरा दिवसात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही भेटलो आहोत. जे मूळ ५२ टक्के आरक्षण आहे त्याला धक्का न लावता आरक्षण कसं देता येईल यावर चर्चा केली असेही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल मांडावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकही बोलावली मात्र काहीही तोडगा निघाला नाही. आता शिवसेनेने पाठिंबा द्यायला हवा म्हणून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे समजते आहे.

दरम्यान,मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. आम्ही स्वतंत्र आरक्षण देणार पण विरोधकांच्या मनात काळंबेरं आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. राज्य सरकार जी काही कारवाई करत आहे ती नियमाने करत आहे. कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की, वार्षिक रिपोर्ट आणि अॅक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. विधेयक मांडण्याआधी सभागृहात एटीआर मांडण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.