खड्डे दाखवून एक हजार मिळविण्याची घोषणा ‘खड्डय़ात’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबरअखेर राज्यातील सर्व रस्ते गुळगुळीत करण्याचा निर्धार

‘१५ डिसेंबरनंतर राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा’, ही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०१६च्या ऑक्टोबरमध्ये केलेली घोषणा. ती वर्ष संपण्याआधीच ‘खड्डय़ात’ गेली असून, आता खड्डेमुक्तीसाठी डिसेंबरचा नवा वायदा देण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ामुळे एका व्यक्तीचा बळी गेल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या बांधकाम विभागाने एका तातडीच्या बैठकीत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून, डिसेंबपर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी यंदा पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना दिला आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर नेहमीच रस्त्यांवरील खड्डय़ांची चर्चा होते. पावसाचे पाणी पडले की त्यात खड्डे बुजविल्याचे दावेही धुवून जातात. खड्डय़ांमुळे वाहनांना अपघात होऊन त्यात हकनाक बळी जातात. गतवर्षी याबाबत टीका झाल्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील सर्व रस्ते १५ डिसेंबपर्यंत खड्डेमुक्त केले जातील, असे जाहीर केले होते.  इतकेच नव्हे, तर १५ डिसेंबरनंतर खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा, अशी आत्मविश्वासपूर्वक घोषणाही त्यांनी केली होती. ते हजार रुपये कुणाला मिळाले तर नाहीतच, परंतु वर्षभराच्या आतच अनेक रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य मात्र निर्माण झाले.

शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ामुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मंत्रालयात तातडीने सचिव व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. त्यात राज्यातील बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे डिसेंबरअखेपर्यंत भरावेत, असे आदेश दिले. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया २५ सप्टेंबर्रयत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्यास बांधकाम विभागाने स्वत: हे खड्डे भरावेत, असे त्यांनी सांगितले.

आणखी एक घोषणा

राज्यातील सर्व रस्ते १५ डिसेंबपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले असले, तरी जे मुख्य, अधीक्षक व कार्यकारी अभियंते आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे १५ नोव्हेंबपर्यंत भरतील, त्यांचा विशेष गौरव करण्यात येईल, अशी आणखी एक घोषणा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मुंबई-पुणे रेल्वेवाहतूक पुन्हा ठप्प

मुंबई : कर्जतजवळ रेल्वे इंजिनला वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरचा खांब तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी पुन्हा खोळंबली. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस कर्जतमध्ये थांबविण्यात आल्या. गुरुवारी खंडाळ्याजवळील मंकी हिल परिसरात मालगाडीचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी या मार्गावर पुन्हा विघ्न आले. रेल्वे इंजिनला वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरचा खांब तुटल्याचे शुक्रवारी सायंकाळी निदर्शनास आले. परिणामी मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रगती आणि डेक्कन एक्सप्रेस कर्जत स्थानकात थांबवण्यात आल्या. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil order officers to make road pothole free by december end
First published on: 09-09-2017 at 05:04 IST