चंद्रकांत पाटील यांचे संकेत; भूविकास बँकेच्या कर्जदारांनाही दिलासा

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचे स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील परिस्थिती बदलेल आणि सत्तेवर येणारे सरकार आतापेक्षाही अधिक मजबूत असेल, विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी साधलेल्या संवादात आगामी विधानसभा निवडणूक, शिवसेना-भाजप युती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधकांची ताकद, शेतकरी कर्जमाफी, आरक्षण आदी अनेक विषयांवर भूमिका मांडली.

‘‘सततच्या दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेचा राज्यातील ९२ टक्के कर्जदार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. मात्र खावटी कर्ज घेणारे, संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविणारे किंवा भूविकास बँकेकडून कर्ज घेणारे शेतकरी आणि सध्याच्या कर्जमाफी निकषात न बसणारे काही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा न झाल्याने त्यांच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकीदार अशी नोंद होते. यातून मार्ग काढण्यासाठीच संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या शेतकऱ्यांचे ६०० ते ७०० कोटींचे कर्ज लवकरच माफ करण्यात येणार आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले.

आदिवासींचे खावटी कर्ज माफ करण्यात  आले असून, त्यासाठी ३७५ कोटी रुपयांचा बोजा सरकारने उचलला. भूविकास बँकेच्या ६२ हजार शेतकऱ्यांचाही कर्जमाफीत विचार करण्यात येत आहे. तसेच कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही या योजनेचा लाभ देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

बहुमत नसलेल्या सत्ताधाऱ्यांना सरकार चालविण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात. मात्र बहुमतातील मजबूत सरकार कोणताही निर्णय घेऊ शकते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दाखवून दिले आहे. आम्हालाही गेल्या पाच वर्षांत सरकार चालविण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागल्या. मात्र आगामी निवडणुकीनंतर मजबूत सरकार सत्तेवर येईल आणि पाच वर्षांत करता न आलेल्या गोष्टी करता येतील, असा विश्वासही  पाटील यांनी व्यक्त केला.