उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; उद्योगांप्रमाणे शेतकऱ्यांची वर्गवारी करून सवलत देणार

राज्यातील शेतकऱ्यांना देशात सर्वात कमी दराने म्हणजेच केवळ ८५ पैसे प्रति युनिट दराने कृषिपंपासाठी वीज पुरविली जाते. मात्र गेल्या पाच वर्षांत बहुतांश शेतकऱ्यांनी बीजबील भरले नसून थकबाकीचा हा आकडा तब्बल १७ हजार कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे उद्योगांप्रमाणे शेतकऱ्यांचीही वर्गवारी केली जाणार असून त्याप्रमाणे वीज बिलात सवलत दिली जाईल अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.

राज्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे असलेली वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम हप्त्याने भरुन ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने प्रोत्साहन योजना आणल्याची माहिती त्यांनी विधान भवनात पत्रकारांशी बोलतांना दिली. देशात सर्वाधिक स्वस्त वीज राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र तरीही निर्यातदार, बागायतदार शेतकरीही वीजबील भरत नाहीत. त्यामुळे महावितरण आर्थिक संकटात आले असून किमान मोठय़ा शेतकऱ्यांनी तरी आपली थकबाकी भरावी असे आर्जव बावनकुळे यांनी यावेळी केले.

राज्यातील १८ लाख शेतकऱ्यांना मिटरशिवाय वीज जोडण्या देण्यात आल्या असून केवळ किती हॉर्स पॉवरची मोटर बसविली आहे, त्याच्या आधारे विजबिल आकारणी केली जाते. गरीब शेतकऱ्यांबरोबरच मोठे बागायतदारही शेतकरीच्या सबबीखाली विजबील भरण्यात टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांचीही उद्योगांप्रमाणे चार विभागात वर्गवारी केली जाणार असून गरीब आणि कमी वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक तर निर्यातदार शेतकऱ्यांना कमी सवलत देण्याबाबतचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. बंद पडलेले उद्योग किंवा घरगुती ग्राहकांकडेही मोठय़ाप्रमात थकबाकी असून ती वसुल करण्यासाठी लवकरत नवीन योजना आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक पाणी पुरवठा व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांची वीज बिलाची तकबाकी १४०० कोटींची आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणे सुरु आहे. या कारवाईमुळे शेतकरी व गावकऱ्यांना पाणी पुरवठयाच्या अडचणी निर्माण झाल्याने थकबाकीची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची योजना त्यांनी यावेळी जाहीर केली. त्यानुसार सध्या असलेल्या मूळ थकीत वीज बीलाच्या रकमेपकी २० टक्के रक्कम व चालू महिन्याचे पूर्ण वीजबील ग्राहकाने भरल्यानंतर वीज जोडणी पूर्ववत करण्यात येईल. उर्वरित थकबाकीची मूळ रक्कम चार मासिक समान हप्त्यांमध्ये एप्रिल, मे, जून व जूल या  महिन्यांच्या चालू वीज बीलासोबत भरण्याची सवलत देण्यात आली असून ती रक्कम भरली नाही तर पुन्हा वीज पुरवठा  बंद केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.