|| प्रसाद रावकर

३० वर्षे जुन्या जलवाहिन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश ; वाहिन्यांचे आयुर्मान संपण्यास आणखी ३० वर्षे शिल्लक :- मुंबईतील ब्रिटिशकालीन मुख्य जलवाहिनीखेरीज जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम करत असलेल्या महापालिका प्रशासनाला ३० वर्षांपूर्वीच्या जलवाहिन्या बदलण्याचेही वेध लागले आहेत. मुंबईतील ३० वर्षे जुन्या जलवाहिन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. मात्र मुळात ६० वर्षे आयुर्मान असलेल्या या जलवाहिन्या बदलण्याची घाई कशासाठी, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

या जलवाहिन्यांचा शोध घेऊन त्यापैकी खराब व गळती होणाऱ्या जलवाहिन्या बदलण्यात येईल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र भूमिगत असलेल्या जलवाहिन्यांमधून नेमकी कुठे गळती होते, कोणत्या वाहिन्या खराब झाल्या आहेत याचा शोध कसा घेणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी मुख्य जलवाहिन्यांमधून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. शुद्घीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मुख्य जलवाहिन्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून मुंबईकरांच्या घराजवळ पोहोचविले जाते. मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या लहान जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी मुंबईकरांच्या घराघरात पोहोचते.

या जलवाहिन्या बदलण्यासाठीच्या निविदांमध्ये नव्या जलवाहिनीचे आयुर्मान ६० ते ७० वर्षांचे असावे अशी अट आहे. मात्र प्रशासनाने नवा फतवा काढून ३० वर्षांहून अधिक जुन्या जलवाहिन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश विभाग कार्यालयांमधील जल विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी १९७९ पूर्वी कोणकोणत्या भागातील जलवाहिन्या बदलण्यात आल्या, याचा शोध सुरू केला आहे. या माहितीच्या आधारे कोणत्या जलवाहिन्या बदलायच्या याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जल विभागातील नियोजन आणि नियंत्रण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. जलवाहिनीचे आयुर्मान ६० ते ७० वर्षांचे आयुर्मान पूर्ण होण्यापूर्वीच जलवाहिन्या बदलण्याची प्रक्रिया हाती घेणार का, असा प्रश्न आहे. यामुळे पालिकेच्या पैशांची उधळपट्टी होण्याची दाट शक्यता असल्याचे जल विभागातील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले.

जलवाहिन्या बदलण्याची गरज का?

ब्रिटिशांनी मुंबई शहरात टाकलेल्या जुन्या मुख्य जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे पाण्याची गळती होऊ लागली होती. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. जलवाहिनीतून गळती होऊन रस्ता खचण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडले होते. या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पालिकेने जीर्ण झालेल्या ब्रिटिशकालीन मुख्य जलवाहिन्या बदलण्याचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले.

३० वर्षे जुन्या जलवाहिन्यांची माहिती मिळविण्याचे काम करण्यात येत आहे. यापैकी खराब झालेल्या, गळती होत असलेल्या जलवाहिन्या भविष्यात बदलण्यात येतील.

– प्रवीणसिंह परदेशी, मुंबई महापालिका आयुक्त