21 September 2020

News Flash

परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती धोरणात बदल

पदव्युत्तरसाठी पदवीचाच विषय घेण्याची अट रद्द

पदव्युत्तरसाठी पदवीचाच विषय घेण्याची अट रद्द

मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या धोरणात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पदवीचा विषयच पदव्युत्तर पदवीसाठी घेणाऱ्यांना शिष्यवृत्तीस पात्र ठरवण्याची जाचक अट रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांने ज्या विषयात पदवी घेतली असेल, त्याच विषयात पदव्युत्तर पदवीसाठी त्याने परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतला असेल तरच त्याला शिष्यवृत्ती देण्याची अट आधीच्या भाजप सरकारने घातली होती. ती जाचक अट आता रद्द करण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले. परदेशी शिष्यवृत्तीसाठी वयाचाही घोळ होता, तोही आता दूर करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातील विद्यापीठे बंद आहेत. मात्र तेथे राहून ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.

वास्तविक, भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अनेक अभ्यासक्रमांना आंतरशाखीय प्रवेश दिला जातो. असे असताना, भाजप सरकारने घातलेली अट चुकीची होती. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या मार्गातील मोठा अडसर आता दूर करण्यात आला आहे. त्यामुळे पदवी एका विषयात आणि पदव्युत्तर पदवी अन्य विषयात घेण्यासाठी परदेशी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शिष्यवृत्तीसाठी मूळ नियमानुसार पदव्युत्तरसाठी ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी ४० वर्षे अशी वयोमर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठीही शिष्यवृत्ती

’ करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परदेशात विद्यापीठे बंद असल्याने तेथे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

’ चालू शैक्षणिक वर्षांसाठी समाज कल्याण आयुक्तालयामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत. १४ ऑगस्टपर्यंत असलेली त्याची मुदतही वाढविण्यात आली आहे.

’ विद्यार्थ्यांना कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करणे शक्य नसल्याने त्यांनी ऑनलाइन किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारावेत, अशा सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 2:59 am

Web Title: changes in foreign higher education scholarship policy zws 70
Next Stories
1 करोनाविरोधातील उपाययोजनांबाबत चर्चा
2 विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला विलगीकरण बंधनकारक -महापौर
3 अतिवृष्टीनंतर किनारपट्टी रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
Just Now!
X